कल्याण।कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलिसाने ढोलकीपटू तरूणाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत सदर तरुणाला दोन टाके पडले आहेत. महेश दत्तात्रय खैरे असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र दगडू तायडे या पोलिसाने दारूच्या नशेत तरूणाला अनेक गोष्टींची विचारणा करत विनाकारण बेदाम मारहाण केली. गौरीपाडा येथील तलावाशेजारील श्री लक्ष्मी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सदर तरूण हॉटेल ऑर्केस्ट्रामध्ये ढोलकी वादकाचे काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान महेश खैरे याला मारहाण करत असताना त्याच्या मित्राने मद्यधुंद पोलिसाचा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस खात्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या मद्यधुंद पोलिसावर पोलिस खाते काय कारवाई करते, याकडे तक्रारदाराचे लक्ष लागले आहे.
का केली मारहाण?
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महेश आपल्या मित्रासह कामावरून घरी आला. रविंद्र तायडे हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असताना त्याची गाडी काढत होता. त्याला वाट देण्यासाठी महेश खैरे याने सोबत असलेल्या रिक्षाचालक मित्रास रिक्षा बाजूला घेण्यास सांगितली. दोघे रिक्षा बाजूला घेत असताना दारूच्या नशेत असलेल्या पोलिसाने त्या दोघांना कुठे राहता, काय करता, अशा प्रश्नांची विचारणा करत मारहाण केली. यावर महेश खैरे याने चौथ्या मजल्यावर राहत असल्याचे सांगितले. तरीही त्या मद्यधुंद पोलिसाने महेश खैरे आणि त्याचा मित्र चेतन यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत महेशला जबर मार लागला आहे, अशा स्थितीत महेशने खडकपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑनड्युटी त्याला धमकावून तक्रार घेण्यास नकार दिला.