ठाणे : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून फिरणाऱ्या इसमास घरी जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने या मद्यपीने पोलिसाला मारहाण केल्याची घटना कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खारेगाव येथे राहणारा संतोष भीमराव देसाई (39) हा कळवा येथील प्रशांत स्वीट मार्ट समोरील रस्त्यावर विनापरवाना मद्यप्राशन करून शुक्रवारी पहाटे 4.30 वाजेच्या दरम्यान फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार मनोहर लोखंडे (51) यांनी मद्यपीस घरी जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून मद्यपी संतोष याने लोखंडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत लोखंडे यांच्या कपाळाला आणि कानाला दुखापत झाली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.