मद्यपी चालकाचा एसटी कार्यालयात गोंधळ

0

जळगाव । चाळीसगाव येथील बदली रद्द करण्यासाठी एका चालकाने चक्क विभागनियंत्रकासह अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून गोंधळ घातल्याची घटना बुधवारी दुपारी जळगाव राज्य परिवहरन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात घडली. याप्रकरणी लिपीक व लघुलेखकाने दिलेल्या फिर्यादीवरून चालक करणसिंग हरसिंग पाटील याच्याविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस ठाणे परिसरात कर्मचारी अधिकार्‍यांनी गर्दी जमली होती.

बदली रद्द करण्याची चालकाची मागणी
एसटी चालक करणसिंग हरसिंग पाटील याची चाळीसगाव डेपोला बदली करण्यात आली आहे. परंतू करणसिंग याने महामंडळाच्या विभागीय कार्यालयात दारूच्या नशेत येवून बदली आदेश न स्विकारता लिपिक व लघुलेखक रहेमान सिंकदर तडवी यांची वाद घालून शिवीगाळ करत गोंधळ घातला. काही कर्मचार्‍यांनी त्याची समजूत घालून कार्यालयाबाहेर नेले परंतू, दारूच्या नशेत तर्रर्रर्र करणसिंग पाटील याने चक्क कार्यालयाबाहेर येऊन विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर व अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना अश्‍लील शिवीगाळ करीत माझी चाळीसगाव बदली रद्द करा अन्यथा आत्मदहन करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने बराचवेळ कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. काही कर्मचार्‍यांनी जिल्हा पेठ पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत पोलिसांनी करणसिंग याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. यानंतर लिपिक व लघुलेखक रहेमान सिंकदर यांच्या फिर्यादीवरून करणसिंग पाटील याच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.