मद्यपी पतीकडून पत्नीचा खून कुटुंबियांचा अंत्यसंस्काचा प्रयत्न

0

जळगाव। शिरसोली येथे पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होवून मद्यपी पतीने पत्नीला मारहाण करून धारधार शस्त्राने तिच्यावर वार केला. यात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने हाणामारीत महिलेला जबर मार बसला. मात्र, काही वेळानंतर महिलेचा मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नातेवाईकांना एमआयडीसी पोलिसांनी स्मशानभूमीतच रोखल्याची घटना घडली. यानंतर महिलेवर जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले. तर महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलबाई अशोक सोनवणे (वय-40) असे मयत महिलेचे नाव आहे.

महिलेवर धारधार शस्त्राने वार
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील जि.प.मराठी शाळेजवळ भटक्या कुटुंबाची घरे आहेत. या ठिकाणी अशोक भिका सोनवणे हे पत्नी कलाबाई व मुला-मुलींसोबत राहतात. अशोक हा पांचाळ (लोहार) काम करतो. तर पत्नी कलाबाई ह्या भंगार वेचून त्यातून मिळणार्‍या पैश्यातून आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायच्या. बुधवारी मध्यरात्री अशोक आणि पत्नी कलाबाई यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी अशोक हा दारूच्या नशेत होता. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अशोक याने पत्नी कलाबाई हिला मारहाण करून धारधार शस्त्र कलाबाई यांच्या छातीत भोसकला. यात त्या गंभीर जखमी होवून खाली कोसळल्या. रात्री मुलगी अनिता हिला जाग आल्याने तिला आई जमिनीवर कोसळलेली दिसली. त्यानंतर अनिता हिने आई कलाबाई यांना भावंडाच्या मदतीने गावातीलच एका रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र या महिलेला जबर मार बसलेला असल्याने डॉक्टरांनी जखमी महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या दरम्यान, रात्री या महिलेचा मृत्यू झाला.

अत्यंसंस्काराची तयारी
पती-पत्नीत वाद होवून पत्नीने केलेल्या वारात महिलेचा रात्री मृत्यू झाल्यानंतर गुरूवारी सकाळी कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. रात्रीची घटना तसेच कुटूंबिय अत्यंसंस्काराच्या तयारीत असल्याची माहिती शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण वराटे व काही ग्रामस्थांना कळताच त्यांनी लागलीच ही बाब एमआयडीसी पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनिल कुर्‍हाडे, एपीआय नाना सुर्यवंशी, खंडागळे, पोलिस कर्मचारी बाळकृष्ण पाटील आदी कर्मचार्‍यांनी महिलेचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नातेवाईकांनाकडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत थांबविले. यानंतर घटनास्थळी जावून संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच मयत महिलेच्या मुलांकडून घटनेची माहिती घेतली.

डिवायएसपींनी घेतली माहिती
एमआयडीसी पोलिसांनी महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यातून घेवून लागलीच शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात रवाना केले. यानंती अशोक याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर जिल्हा रूग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी त्या ठिकाणी येवून पोलिस निरीक्षक कुर्‍हाडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली व मयत महिलेचा मुलगा रितेश व अनिता यांची चौकशी करून त्यांच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. काही वेळानंतर महिलेचे नातेवाईकांनीही जिल्हा रूग्णालय गाठले होते.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा
पोलिसांनी महिलेच्या पतीस घेतले ताब्यात
नेहमी व्हायचे भांडण..
कलाबाई व अशोक यांच्यामध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून वाद व्हायचे. तर अशोक हा भांडणाच्यावेळी कलाबाई यांना मारहाणही करायचा. यातच अशोक याला कधी-कधीच हाताला काम मिळत असल्याने कलाबाई ह्यां भंगार वेचून मिळणार्‍या पैश्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायच्या. कलबाई यांना करण, शिवम, रितेश, किरण, लखन हे पाच मुले आहेत तर अनिता, काजल, राणी ह्या तीन मुली असून अनिता हिचे लग्न झाले आहे. तर करण याचे लग्न झाले असून तो सुरत येथे राहायला आहे. दरम्यान, यातच आठ मुला-मुलींपैकी चार ते पाच जण हे लहान असून त्यांना आता आसरा देणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसात गुन्हा
एमआयडीसी पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी गेल्यानंतर अशोक सोनवणे याला ताब्यात घेतले होते. दुपारी कलाबाई यांच्यावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या सोपविण्यात आले. यानंतर शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अशोक सोनवणे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिरसोली परिसरात खळबळ उडाली आहे.