मद्याचे घोट रिचवित परमीटरुम बारमध्ये तपासणी करणारा निरिक्षक दहीवडे निलंबित

0

राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांची कारवाई ः सोशल मिडीयावर व्हिडीओ झाला होता व्हायरल

जळगाव : मद्याचे घोट घेत एका परमीट रुम बियरबारमध्ये हॉटेलच्या रेकॉर्डची तपासणी करतांनाचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक नरेंद्र दहीवडे यांचा दोन दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाला. मद्यप्राशन करत तपासणी करणे दहीवडे यांना चांगलेच भोवले असून याप्रकरणी नरेंद्र दहीवडे यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ सोमवारी जळगावात आले होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. जिल्ह्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अहवाल तयार करुन तो उपायुक्तांकडे सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे हा अहवाल पाठविला. त्यावर सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई होऊन तसे आदेश प्राप्त झाले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे. सदचा व्हिडीओ हा 2018 मधील जळगाव शहरातील एका हॉटेलातील असल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

हाच तो व्हायरल व्हिडीओ