मुक्ताईनगर- तालुक्यातील पिंप्रीपंचम वनविभागाच्या रामगड येथील शासकीय रोपवाटिकेतील कर्तव्यावर असलेल्या तीन वनरक्षकांना मद्याच्या नशेत मारहाण करीत एका महिला वनरक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी विजय मधुकर फणसे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी प्रल्हाद रामराव माळी (लोहारखेडा), प्रमोद गेंदू पाटील (पिंप्रीभोजना) व माधवराव सदाशीव पाटील (कर्की) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपींनी रोपवाटिकेत अनधिकृतरीत्या प्रवेश करीत तुम्ही पैसे खातात, लाकडाच्या गाड्या पकडत नाही, असे म्हणत वनरक्षकांना मारहाण केली तसेच सहकारी तुकाराम परशुराम पाटल हे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करीत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली तर महिला वनरक्षक घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असताना तिचा विनयभंग करून धमकी देण्यात आली. दरम्यान, तिसर्या आरोपीलादेखील अटक करण्यात येत असल्याचे निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.