मद्य विक्रीच्या मागणीवरुन शिवसेनेचा राज ठाकरेंना चिमटा

0

मुंबई: राज्यात मद्यविक्रीची दुकाने सुरू करावीत, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलल्यानंतर यावर उपहासात्मक टीका करत शिवसेनेने चिमटा काढला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असे म्हणत शिवसेनेने त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्रे असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणार्‍या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज यांनी मोठेच उपकार केले आहेत. या मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरड्या घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो. वितरक जेव्हा कारखान्यांकडून दारूचा साठा विकत घेतो तेव्हा विक्री केलेल्या दारूवर कारखानदार हा उत्पादन शुल्क आणि विक्री कर शासनाकडे भरतात. त्यामुळे आधी कारखाने मग दुकाने चालू करावी लागतील, असेही सेनेने म्हटले आहे.