बारामती । कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने दोन दिवसीय मधमाशीपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रशिक्षणास बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या भागांतून शेतकर्यांनी उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला. यावेळी केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुनिल पोकरे, शास्त्रज्ञ डॉ. धनंजय वाखले, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, केव्हीकेचे डॉ. सय्यद शाकीय अली, पीक संरक्षण तज्ञ डॉ. मिलिंद जोशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजित मगर, महेश रुपनवर, गणेश जाधव, श्रीमती स्मिता वर्पे, अल्पेश वाघ, प्रशांत गावडे आदी उपस्थित होते.
शास्त्रज्ञ डॉ. सुनिल पोकरे यांनी यावेळी बचत गटांमार्फत मधोत्पादन कसे करता येईल याची माहिती दिली. ग्रामीण महिला व युवकांसाठी मधमाशीपालन एक कृषिपुरक उद्योग याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ डॉ. वाखले यांनी शिबीरात मधमाशीच्या प्रजाती, वसाहत, माश्यांचे प्रकार व आयुष्यमान, कामकाज, मध व मधाचे उत्पादन, मधाची गुणवत्ता याविषयी सांगितले. प्रकल्प उपसंचालक देशमुख यांनी प्रशिक्षण आयोजनाची गरज व ग्रामीण मधमाशीपालन याबद्दल माहिती दिली. डॉ. सय्यद यांनी पीक उत्पादनवाढीसाठी मधमाशीचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. मधमाशीपालन सुरू करण्यासाठी योग्य जागेची निवड, मधपेटीची देखभाल व पीक संरक्षण साधनांचा सुरक्षित वापर याविषयी डॉ. जोशी यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.