मधमाशी संशोधनातुन विद्यार्थांना परदेशी करियर करण्याची संधी

0

दोंडाईचा। भारतीय विद्यार्थांनी मधमाशी पालन, प्रशिक्षण व संशोधन विषयात रस घेतल्यास व रोज थोडे – थोडे मधमाशीवर संशोधन केल्यास त्यांना या क्षेत्रात परदेशात उत्तम करियर करण्याची संधी उपलब्ध आहे. अमेरिका, इस्त्रायल या देशा मध्ये या व्यवसायाला विशेष महत्व आहे. तेथील सरकार या व्यवसायाला वृध्दींगत करण्यासाठी अनेक योजना राबवतात. भारतीय विद्यार्थांना परदेशात मधमाशी पालनावर मास्टर डिग्री घेतल्यास नवीन काही तरी करण्याची संधी मिळेल, असे मत नाशिक येथील मधमाशी पालन, प्रशिक्षण व संशोधन तज्ञ डॉ. तुकाराम निकम यांनी मधमाशी पालन शिबीर प्रसंगी विद्यार्थांना व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

मधमाशी शेतकर्‍यांसाठी परिस
दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे सपना मधमाशी पालन, प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने माय-दादा बंगला दाऊळ रोड दोंडाईचा येथे विद्यार्थी व शेतकर्यांसाठी मोफत मधमाशी पालन, प्रशिक्षण व संशोधन या विषयावर शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा प्रशिक्षण केंद्राचे संचालक बापूसाहेब रावल होते. तर व्यासपीठावर जि.प. धुळेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, शिंदखेडा तालुका दुध संघाचे चेअरमन विक्रांतसिंह रावल, हुसेन विरदेलवाला, जे.पी.गिरासे, आय.एच.खान, सचिन राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब रावल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की मधमाशी शेतकर्‍यांसाठी परिस आहे. जलद गतीने परागीकरण करणारा लहानसा जिव असुन साधारण एकरी 1 युनिट मधमक्षिका पालनाने शेती उत्पादनात 20 टक्के एवढी वाढ होत असते. जागतिक स्तरावर अमेरिका सारख्या विकसनशील देशाने ही गोष्ट ओळखत दोन विमान फक्त मधुमक्षिका आणण्यासाठी ऑस्टिया या सारख्या छोट्या देशात पाठविल्या आहेत. मधमाशी फक्त मध आणि मेण यासाठी उपयुक्त किटक नसुन जलद परागीकरण करणारे नैसर्गिक यंत्रच आहे. असे बापूसाहेब रावल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

निकम यांनी सांगितले मधमाशी पालनाचे फायदे
यावेळी डॉ. तुकाराम निकम यांनी मधमाशी पालनाचे फायदे, कृषी क्षेत्रात मधमाशीचे महत्व, परागीभवन, मधमाश्यांच्या जाती, मधमाशी संशोधनातुन परदेशी करियर, परागकण तयार करण्याची पध्दत तसेच परागीभवनाचे महत्व, कृत्रीम खाद्य, मधमाशीचे स्थलांतर, आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणुन मधमाशी पालनाचे फायदे, उत्पादन प्रकिया, मधमाशी पालनातील समज-गैरसमज, मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य, मधुमाश्यांच्या प्रजाती, मधाच्या पोळ्यांची स्थापना, मधमाश्यांच्या वसाहतीची स्थापना करणे, वसाहतीचे व्यवस्थापन व मधाची काढणी तसेच विक्री व उत्पादन वाढीसाठी मधमाशीची गरज या विषयावर डॉ.तुकाराम निकम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.