आमदार हरीभाऊ जावळे ; विजयादशमीच्या मुहूर्तावर मसाकाचे बॉयलर प्रदीपन
फैजपूर- मधुकरसाठी सध्या कसोटीचा काळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या प्रमाणे चढ-उतार येत असतात तसे मधुकरच्या बाबतीत घडत आहेत त्यामुळे सर्वच घटकांनी या परीस्थितीत संयम ठेवून कार्य केल्यास गेल्या 40 वर्षांपासून अखंडपणे चालणार्या मधुकरला पुन्हा सोनेरी दिवस येतील ‘थकहमी’साठी मंत्रालयात भटकंती असली तरी ती मिळेल व कारखाना जोमाने सुरू होईल असा दुर्दम्य आशावाद व्यासपीठावर उपस्थित आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व्यक्त करून ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोर्यून वाहे एक प्रकाश प्रकाश’ या गीताचा दाखला देत मधुकर बद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या निमित्त होते 43 व्या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगाचे. परंपरेप्रमाणे दसर्याच्या मुहूर्तावर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. यावेळी सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे ऊस उत्पादक शेतकरी तथा कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजा करून बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
ताळेबंदामुळे सरकेना फाईल -आमदारांची खंत
आमदार हरिभाऊ जावळे यांनी आपल्या मनोगतात कारखान्याच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. सत्ताधारी आमदार म्हणून सरकार मधील मी एक घटक आहे. मंत्री महोदय हमीपत्र पत्र देण्यासाठी होकार देतात पण अधिकारीवर्गाने कारखान्यांचा ताळेबंद बघितल्यावर फाईल पुढे सरकत नाही ही एक दुर्दैवी बाब आहे त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे व पुढील दहा ते पंधरा दिवसात सर्व सुरळीत होईल, तोवर सर्वांनी संयम ठेवावा व एकत्र येऊन परीस्थितीला सामोरे जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आशेचा किरण आजही जिवंत -माजी आमदार
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मधुकरच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत जेवढी उत्सुकता व उत्कंठा चाळीस वर्षांपूर्वी मधुकरच्या निर्मिती प्रसंगी नव्हती एवढी उत्सुकता यंदाचा हंगाम सुरू होईल का नाही, थकहमी मिळेल का नाही, याची आहे मात्र आशेचा किरण आजही जिवंत आहे, असे सांगत त्यांनी सुरेश भट यांच्या ‘उमेद’ या कवितेतील ‘विझलो मी जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटून उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ याचा दाखला दिला.
कारखान्यासाठी सर्वांचे प्रयत्न कौतुकास्पद -चेअरमन
चेअरमन शरद महाजन यांनी प्रतिकूल व आर्थिक अडचणी असताना सुद्धा सर्वांचे हिमतीमुळे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन करीत आहोत. 62 कोटींचा तोटा, पावसाचे पाणी कमी, त्यात विभाग प्रमुख नसल्याने प्रभारी वर असलेला कार्यभार या सर्व परीस्थितीत शिवधनुष्य पेलवायचे आहे. राजकारण न करता कारखाना टिकवण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यावेळी त्यांनी कामगारांचे विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले. माजी आमदार अरुण पाटील तसेच कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार हरीभाऊ जावळे, चेअरमन शरद महाजन, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, व्हा.चेअरमन भागवत पाटील, शेतकी संघाचे सभापती तथा संचालक नरेंद्र नारखेडे, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, विद्यमान संचालक राजेंद्र चौधरी प्रतिभा चौधरी, युनियन अध्यक्ष किरण चौधरी, प्रभारी कार्यकारी संचालक तेजेंद्र तळेले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
11 टक्के बोनस आर्थिक उपलब्धतेनुसार देणार
परंपरेप्रमाणे कारखाना कामगारांना संचालक मंडळाच्या निर्णयानुसार 11 टक्के बोनस व अकरा दिवसाची बक्षिसी जाहीर करण्यात येऊन आर्थिक उपलब्धतेनुसार ती देण्यात येईल असे चेअरमन शरद महाजन यांनी जाहीर केले. बॉयलर कामगार लिलाधर भवानी पाटील यांचा आमदार जावळे यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.