मधुकर तोडमल यांचे निधन

0

मुंबई । ज्येष्ठ अभिनेते, लेखक, अनुवादक, निर्माते प्रा. मधुकर तोरडमल यांचे आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मूत्रपिंड निकामी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. ते 84 वर्षांचे आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदीर येथे सकाळी 10 ते 10.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.

मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वयोपरत्वे काहीच सुधारणा होत नसल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले होते. शुक्रवार रात्रीपासून त्यांची तब्येत आणखीनच खालावली. तसेच ते गेल्या काही काळापासून लोकांमध्येही फारसे मिसळत नव्हते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावण्यास सुरुवात केली होती.

नाट्यसृष्टीचे मामा
मधुकर तोरडमल यांना अवघी नाट्यसृष्टी मामा म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकातील प्राध्यापक बारटक्केची त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. लेखक म्हणून त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असे साहित्यप्रकार हाताळले असून अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबर्‍यांचा अनुवादही त्यांनी केला आहे.

प्रोफेसर बारटक्केंचा गाजलेला इतिहास
तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे 5000हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत असत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. अशा पध्दतीने तोरडमलांना समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात आश्‍चर्य समजली गेली. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 1972 रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे 3 प्रयोग झाले. बालगंधर्वच्या त्या प्रयोगांना येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आले होते. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई अशी दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.

तोरडमलांची नाट्य संपदा
तोरडमल यांनी नाट्यसंपदा, नाट्यमंदार, धि गोवा हिंदू असोसिएशन या आणि प्रामुख्याने चंद्रलेखाच्या नाट्यसंस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. गुड बाय डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, चांदणे शिंपित जाशी, बेईमान, अखेरचा सवाल, घरात फुलला पारिजात, चाफा बोलेना, म्हातारे अर्क बाईत गर्क आदी अनेक नाटके केली. संगीत मत्स्यगंधा या नाटकात त्यांनी साकारलेला भीष्मही प्रचंड गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे.

मराठी चित्रपटांतील भूमिका
कमलाकर तोरणे दिग्दर्शित ज्योतिबाचा नवस हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसं, आत्मविश्वास, शाब्बास सूनबाई हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.