मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री संशयास्पद?
माहिती सभासदांना देण्यास टाळाटाळ : जळगाव जिल्हा बँकेकडून माहिती अधिकारातही मिळेना माहिती
Sale of Madhukar Cooperative Sugar Factory Suspicious? फैजपूर (निलेश पाटील) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता सिक्रुटायजेशन कायद्यान्वये ताब्यात घेत विक्री केली. या विक्री संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता जिल्हा बँक माहिती सभासदास देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मधुकरची विक्री संशयास्पद तर नाही? ही शंका उपस्थित होत आहे.
अवघ्या 63 कोटींना कारखान्याची विक्री
उत्तर महाराष्ट्रातील 43 वर्षाची अखंड सुरू असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधून जेडीसी बँकेने अवघ्या 63 कोटीला विक्री केला. या विक्री संदर्भात जळगाव जिल्हा बँकेचे सभासद रमेश मोतीराम चौधरी (जळगाव) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 32 अन्वये लेखी माहिती जिल्हा बँकेला मागितली मात्र अद्यापपर्यंत जिल्हा बँकेने अर्जदार रमेश चौधरी यांना कुठलीही माहिती कागदपत्रे दिलेली नाही या मधुकरच्या विक्रीत काय गोड बंगाल ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
आठ मुद्यांच्या आधारे मागितली माहिती
तक्रारदार यांनी सभासद या नात्याने माहिती मागितली असून मधुकरच्या 27.19 हेक्टर जमीन, प्लांट, मशिनरी व इमारत सह साखर कारखाना व डिस्टलरी विक्रीचा निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतला आहे. त्यांच्या दस्तऐवजाच्या नकला मिळाव्या यासाठी रमेश चौधरी यांनी जिल्हा बँकेला दिनांक बुधवार, 2 नोव्हेंबर रोजी माहितीचा अर्ज सादर केला आहे.
या मुद्यांद्वारे वेधले लक्ष
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांनी मधुकर सहकारी कारखान्याबाबत 13 एप्रिल 2022 रोजी खासदार, आमदार, बँकेचे संचालक कारखान्याचे चेअरमन व संचालक यांच्या आयोजित सभेचे इतिवृत्त, बँकेने कारखान्याच्या विक्री करावयाच्या मालमत्तेचे मूल्यांकन, मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीसाठी काढलेल्या दोन्ही जाहिराती, मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीसाठी इच्छुकाने भरलेली निविदा व निविदेसोबत सादर केलेले कागदपत्र, 10 टक्के ईएमडी भरल्याबाबत अ- सदर रक्कम डिमांड ड्राफ्टने भरली असल्यास डिमांड ड्राफ्टची नक्कल ब- सदर रक्कम भरलेली असल्यास कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतून सदर एनइएफटी /आरटीजीएस केलेली आहे त्याबद्दलचे दस्तावेज, 10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या संस्थेतील मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीसाठी सभेचा ठराव, मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीदाराला बँकेने दिलेला विक्री आदेश, मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता खरेदीदाराने 10 नोव्हेंबर 2022 नंतर भरलेली रकमेबाबत अ-किती रक्कम भरली. ब-सदर रक्कम डिमांड ड्रॉफ्टने भरली असल्यास डिमांड ड्राफ्ट ची नक्कल. क-सदर रक्कम एनइएफटी/ आरटीजीएस ने भरलेली असल्यास कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखेतून सदर एनइएफटी/ आरटीजीएस केलेली आहे.त्याबद्दलचा दस्तावेज
या आठ मुद्द्यांच्या आधारे रमेश चौधरी यांनी जळगाव जिल्हा बँकेला माहिती मागितली असून अद्याप पर्यंत कागदपत्रे जळगाव जिल्हा बँकेने त्यांना कुठलीही माहिती सादर केलेली नाही.
गौड बंगाल असल्याचा संशय
सभासद या नात्याने मी जिल्हा बँकेला अर्ज देऊन माहिती मागितली आहे. अद्यापपर्यंत मधुकर विक्री संदर्भातील मला कुठलीही कागदपत्रे अथवा माहिती जिल्हा बँकेने दिलेली नाही. मधुकर विक्री संदर्भात गोड बंगाल असल्याची दाट शक्यता असल्याचे जिल्हा बँकेचे सभासद रमेश चौधरी म्हणाले.