मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला त्वरित टॅमिफ्लू द्या

0

पुणे । रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित रुग्ण आल्यास त्यांना प्रथम मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार आहेत का याची तपासणी करावी. त्यानंतर त्यांना तातडीने टॅमिफ्लूच्या औषधांचा डोस द्या, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी खाजगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या आहेत.

राज्यात 1 हजार 215 जणांचा बळी
पुण्यासह राज्याच्या इतर शहरांमध्येही स्वाइन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लू मृतांचा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. एच 1 एन 1 या विषाणुने 2015 पासून आतापर्यंत देशात 3 हजार 885 जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील बळींची संख्या ही 1 हजार 215 इतकी आहे. तर एकट्या पुण्यातच स्वाइन ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 69 वर पोहचली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मृत्यूचे प्रमाण 60 टक्के
मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता ही फार कमी असते. मात्र त्यांना एच 1 एन 1 ची लागण झाली तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्के असते. सर्दी, खोकला, ताप असलेला रुग्ण तपासणीसाठी खाजगी व सरकारी रुग्णालयात गेला असता डॉक्टरांनी रुग्णाला आरोग्याचा इतिहास विचारणे गरजेचे आहे. रुग्णाला मधुमेह व उच्चदाब असल्याचे कळताच त्यांच्या वर त्वरीत टॅमी फ्लू देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने वैद्यकीय तज्ज्ञांना दिल्या आहेत.

स्वाइन फ्लूचा प्रसार हवेद्वारे
मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुख्यत्वे स्वाइन फ्लू होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र झाल्यास मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. रुग्ण तपासणीसाठी आल्यास त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याची विचारणा करणे गरजेचे आहे. त्यावरून त्यांना 5 दिवसात टॅमी फ्लू देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूचा प्रसार हवेद्वारे होतो. त्यामुळे शिंकताना हातरुमालाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच अस्वच्छ हात डोळ्याला लावल्यावरही प्रसार होतो. त्यामुळे हात स्वच्छ धुणेदेखिल गरजेचे आहे.
डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग