पिंपरी :- पिंपळेनिलख येथील मधुरभाव वृध्दाश्रमातील आजी आजोबांसाठी सीएनएस शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ पालक दिन व गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण बघून आजी-आजोबांचे मनोरंजन झाले.
या कार्यक्रमाला सीएनएस शाळेच्या संस्थापिका अपर्णा गडकरी, मधुरभाव वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक विठ्ठल करंजाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थापिका अपर्णा गडकरी म्हणाल्या, “आजी-आजोबांचे नातवंडाबद्दलचे प्रेम हे निरपेक्ष असते. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आजी-आजोबांचा सहवास नातवंडासाठी मोलाची भूमिका बजावतो. या उद्देशाने आजी-आजोबा आणि नातवंडे यांचे नाते दृढ करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते”. हा कार्यक्रम पाहून मधुरभावमधील ज्येष्ठ पालकांचा उत्साह द्विगुणित झाला.