मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर पुरस्कार

0

मुंबई (प्रतिनिधी) – राज्य सरकारतर्फे 27 फेब्रुवारीरोजी मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने भाषाविषयक पुरस्कारांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यावर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.27) सायंकाळी 6 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

विविध साहित्य प्रकारांचे 35 राज्य वाङ्मय पुरस्कार
याहीवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे 35 राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार मराठीच्या पोतडीतून हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 15 दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे.

विधानभवनात मराठी अभिमान गीताचे समूहगायन
यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विधानभवन परिसरात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, यांच्यासह विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि पुरस्कार विजेते साहित्यिक, मराठी अभिमान गीताचे समूहगायन करणार आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन, 27 फेब्रुवारीरोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अभिनंदनाचा ठरावही दोन्ही सभागृहांत मांडला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्येही सकाळच्या सत्रात 11 वाजता व दुपारच्या सत्रात 4 वाजता मराठी अभिमान गीताचे समूहगायन होणार आहे.