‘मधूर’ जगण्यासाठीची त्यांची जीवघेणी धडपड!

0

बारामती (वसंत घुले) । दररोजच्या जगण्याची लढाई तीव्र असली तरी रानोमाळ भटकंती करत दररोजचा दिवस ढकलायचा हे या कुटूंबाचे नित्याचेच काम. फार लहानपणी पारंपारीक हेच काम आम्ही करायचो, असे सांगणारे कुटूंब मात्र प्रत्यक्ष आज जगो की मरो अशीच भुमिके राहते. पाय घसरला तर काय होईल? हेही सांगणे कठिण अशी परिस्थिती दररोजच येत राहते. कधीकधी हाती काहीच लागत नाही. मात्र अथक कष्टाने कमाविले तर हातात निदान चारशे-पाचशे रूपये
तरी मिळतात.

त्याने छोटी फांदी सुर्‍याने तोडायला सुरूवात केली. जवळजवळ दहा मिनिटात फांदी तुटायची वेळ ुआली… माशा उठत होत्या म्हणून तो बिडी ओढून मधमाश्यांवर धूर टाकत होता… पायाला माशा चावतच होत्या…एका हाताने माशाना झटकत समोरच्या मधपोळ्यावर पोळ्यावर त्याचे लक्ष होते. अशातच फांदी अर्धवट तुटून खालच्या फांदीला अडकली…तसा पोरगा बापाला ओरडला. ताबडतोब वर या म्हणाला. कारण त्याला माशांनी घेरले होते. परंतु मधमाशांचे पोळे पकडण्यासाठी वडीलांना दिलेला तो आवाज होता. वडील कसेबसे पोळ्यापर्यंत गेले. त्यांनी फांदी तोडून हातात घेऊन खाली उतरण्यास सुरूवात केली. मुलाची आई पोळे घेण्यासाठी ताट घेऊन उभी होती. वडील उतरून बुंध्यापाशी आले. आणि त्यांनी पत्नीच्या ताटात पोळे टाकले. पोरगाही उतरला. या कुटूंबाच्या चेहर्‍यावर रोजगार मिळाल्याचे समाधान होते. मात्र त्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा हा रोमांचकारी होता.

आजच्या दिवसाचे जगणे सुसह्य
एका मध काढणार्‍या कुटूंबाची ही रोमांचक कहाणी आहे. बारामती एसटी आगारातील पार्कींगनजीकच्या झाडावर मधाचे पोळे या कुटुंबास आढळून आले. वेळ होती दुपारी चारची. झाड उंच होते. पोळे तर त्याहूनही छोट्या फांदीवर होते. पती-पत्नी, एक पंधरा वर्षाचा पोरगा हातात पिशवी आणि एक मोठी परात व सूरा एवढेच साहित्य घेऊन आले होते. त्यांनी मधाच्या पोळ्याची पाहणी केली. प्रथमत: पोराने चढायचे शेवटच्या फांदीपर्यंत जायचे ठरले. मधमाश्या चावणार याची तर खात्री असतेच. तरीसुध्दा याच्यातून बचाव केलाच पाहिजे. यासाठी बिडीच्या धुराचा वापर करायचा म्हणून या पोराने चार बिड्या व काडेपेटी खिशात टाकली. एका हातात सूरा घेतला व झाडावर चढायला सुरूवात केली. अंदाज घेऊन अडचणीवर सामना करत झपाझपा तो झाडावरती चढला. आर्धी चड्डी, फाटका शर्ट, केस विस्कटलेले अशा अवस्थेत तो त्या फांदीवर गेला. हे मधमाशांचे पोळे हातात आलेच पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसाचे जगणे सुसह्य होईल, हेच त्याचे लक्ष्य होते. या पोळ्यातून मिळणारा एक दिड किलोचा मध त्याला चारशे ते पाचशे रूपये मिळवून देणार होता. यासाठी तो जीवाचीही पर्वा करत नव्हता.

त्या कष्टाचे योग्य मोल नाहीच
मध घेण्यासाठी दहा बाराजण तयार होते. मध त्यांनी ताटात व्यवस्थित काढले. पाचशे रूपये त्याची किंमत सांगितली. गर्दीतले मात्र त्याला तोच मध 300 ते 400 रूपयाच्या दरम्यान मागत होते. विशेष म्हणजे या गर्दीने त्यांचे कष्ट पाहिले होते. मात्र त्या कष्टाचे मोल होत नव्हते. गर्दी वायदा करत होती. अखेर हा मध चारशे रूपयाला विकला गेला. जगण्याची आजची लढाई तरी संपली होती…उद्याचे काय?