पोलिसांची कारवाई ; मारहाणीतील पसार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
भुसावळ- शहरातील साकरी रोडवरील रांका नगरात काही संशयास्पद असलेले लोक राहत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर लावलेल्या सापळ्यात मध्यप्रदेशातील बर्हाणपुरातील दोघा हद्दपार तर मारहाणीच्या गुन्ह्यातील अन्य दोन पसार आरोपींच्या मुसक्या आवळण्या आल्या. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. विरेद्र ऊर्फ कालु नरेद्र चंदन (38) व प्रमोद नरेद्र चंदन (30, दोन्ही रा.लालबाग मिलचाळ नं.चार, घर न.10, बर्हाणपूर) या हद्दपार तर शे.शरीफ शे.फरीद (32, रा.लालबाग गांधी कॉलनी, बर्हाणपूर) व राहुल उर्फ गोल्या कैलास दिवेकर (24, रा.लालबाग, गुलाबगंज, शिव मंदिराजवळ, बर्हाणपूर) या पसार आरोपींना अटक करण्यात आली.
गुप्त माहितीवरून कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, प्रवीण ढाके, संजय भदाने, विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण, बंटी कापडणे आदींनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. कालू व प्रमोद चंदन यांना बर्हाणपूरसह खंडवा व इंदौर जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2018 पासून हद्दपार करण्यात आले तर अन्य दोघांविरुद्ध लालबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पसार झाले होते. आरोपींना लालबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.