पुणे । मध्यमवयीन महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी इंडियन मेनोपॉज सोसायटी (आयएमएस) ने पुढाकार घेतला असल्याची माहिती आयएमएसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुवर्णा खाडीलकर यांनी दिली.
इंडियन मेनोपॉज सोसायटी, पुणे चॅप्टर आणि इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकोलॉजी तसेच पुणे ऑब-जीन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिडलाइफकॉन 2017 या परिषदेचे आयोजन करण्यात आले होतेे. त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेमध्ये मध्यम वयातील युरोगायनॉकॉलॉजीसंबंधी आजार, गर्भधारणा, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, एंडोक्राइन समस्या, आहार, व्यायाम, केस स्टडीज या संबंधित विषयांवर तज्ज्ञांतर्फे चर्चा करण्यात आली. जवळपास 200 डॉक्टर्स या सत्रासाठी उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन एएफएमसीच्या डीन मेजर जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयएमएसच्या अध्यक्ष आणि नियोजन अध्यक्ष डॉ. सुवर्णा खाडीलकर, नियोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. सविता मेहंदळे, नियोजन सचिव डॉ. वैशाली बिनीवाले, डॉ. पराग बिनीवाले, संस्थापक अध्यक्ष डॉ. रमा वैद्य, पीओजीएसचे अध्यक्ष डॉ. निशिकांत श्रोत्री आणि पॅट्रॉन डॉ. ज्योती उन्नी आदी मान्यवर उपस्थित होते.
मोफत समुपदेशन
आयएमएसने नुकतीच वरिष्ठ महिला स्वास्थ योजनेची सुरुवात केली असून या योजनेवर लक्ष केंद्रित करणे हे यंदाचे ध्येय असणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 75 केंद्रांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवशी येथे ग्रामीण आणि निमशहरी विभागातील स्त्रियांसाठी मोफत समुपदेशन शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिराअंतर्गत स्त्रियांची तपासणी करून त्यांना सवलतीच्या दरात उपचार दिला जात आहे.
एकात्मिक संशोधनाची गरज
1995 साली स्थापन झालेल्या आयएमएसचे आता 43 चॅप्टर्स असून त्यामध्ये जवळपास 3025 सदस्य आहेत. शिबिरांद्वारे ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी चॅप्टर्सने 12 विविध भाषांमध्ये प्रेझेंटेशन मॉड्युल्स तयार केले आहेत. आम्ही भारतामधील 20 गावे दत्तक घेतली असल्याचे डॉ. रमा वैद्य यांनी सांगितले.