भुसावळ। मध्यप्रदेशातील इच्छापूर येथून शहरात अवैधरित्या विक्रीसाठी गुटखा भरुन आणणार्या वाहनाची खडका चौफुलीवरील बालाजी तोलकाट्यावर तपासणी करण्यात आली असता पोलीसांना यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे पॅकेट आढळून आले. अन्न, औषध प्रशासनास याची माहिती देऊन छाणणी केल्यानंतर एकूण 5 लाख 9 हजार 288 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
मध्यप्रदेशातून केली खरेदी
शहरातील पापानगरातील रहिवासी शेख फैजान शेख ईस्माईल हा अॅपेरिक्षा क्रमांक एम.एच.19, बीडब्ल्यू 0184 मध्ये मध्यप्रदेशातील इच्छापूर येथून गुटका भरुन आणत असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर, दिपक जाधव यांनी संशयावरुन गाडीची तपासणी केली असता यात विमल, मिराज, तंबाखू आदींचे पॅकेट आढळून आले. पोलीस कर्मचार्यांनी गाडी जमा करुन बाजारपेठ पोलीस स्थानकात आणली. सकाळी याबाबत पालिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागास माहिती दिली असता बाजारपेठ पोलीस स्थानकात येऊन त्यांची पकडलेल्या मालाची छाणणी केली. यात विमल गुटखा, व्ही.एम. तंबाखू, नखराली सुपारी, मिराज तंबाखूचे पॅकेट आढळून आले. अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलींद शहा, अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, पालिकेचे अन्न, सुरक्षा अधिकारी अशोक फालक, आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे यांनी माल ताब्यात घेतला.