मध्यरात्री गेंदालाल मिलमध्ये दोन गटात हाणामारी; सात जणांना अटक

0

जळगाव। शहरातील गेंदालाल मिल परिसरात गुरूवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. तर मध्यरात्री शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात येवून त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून वाद उफाळला
गेंदालाल मिल येथे गुरूवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून काही लोकांमध्ये वाद उफाळून आला. यानंतर वादाचे रुपांतर हाणमारीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव लाठ्या-काठ्या घेवून रस्त्यावर उतरले आणि दोन गटात तुफान हाणामारी झाली. गेंदालालमिल परिसरात तुफान हाणामारी सुरू असल्याची शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे कळताच पळापळ सुरू झाली होती. यानंतर शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दिपक आधार सोनवणे, कुणाल अशोक हटकर, दुर्गेश सन्यास, किरण वैजनाथ शर्मा, सलीम खान कादर खान पटेल, समीर नजीर महंम्मद रंगरेज, शेख सद्दाम, नईम तुकडू सैय्यद, अजीज रशीद पठाण, पट्ट्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह पाच ते सहा जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांना पोलिस कोठडी
शहरातील गेंदालाल मिल परिसरात जमावबंदीचे आदेश असून देखील दंगल घडून हाणामारी करणारे दीपक आधार सोनवणे, सलीमखान कादरखान पटेल, समीर नजीर मोहंमद रंगरेज, शेख सद्दाम, हिंमत कडू सैंदाणे, अजीज रशीद पठाण, किरण वैजनाथ शर्मा अशा सात जणांना शहर पोलिसांनी शोध मोहिम राबवत शनिवारी अटक केली. यानंतर शनिवारी दुपारी दंगलीतील सातही संशयितांना जी. जी. कांबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.