मुंबई | राज्यात मध्यवधी निवडणुका निर्माण होणार असल्याचे भाकित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्वीटवर केले आहे. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यामुळे मध्यवधीच्या शक्यतेवरून राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात असल्याचे दिसून येते.
या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणत्याही जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी न करता समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील विविध जिल्ह्यांत काँग्रेस, शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षाशी आघाडी केली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापुर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली आदी जिल्हा परिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर रायगड, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड , लातूर, वर्धा आदी ठिकाणी काँग्रेस ,शेकाप, रिपाई आदी समविचारी पक्षांशी आघाडी करुन निवडणूक लढवित आहे.
राज्यात निवडणुक होत असलेल्या १० महापालिकांपैकी मुंबई , सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड आदी महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुक लढत आहे. तर ठाणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण १३१ जागापैकी ११६ जागी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली आहे तर १५ जांगावर मैत्रीपुर्ण लढत होत आहे. पुणे महापालिकेसाठी एकूण १६२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५६ जागा व काँग्रेस ३० जागा तर ७६ ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत होत आहे. नाशिक महापालिकेत १२२ जागांपैकी ६० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर ४३ जागांवर काँग्रेस पक्ष लढत आहे. नागपूर मध्ये रिपाई सोबत आघाडी करुन लढत आहे.
या पत्रकार परिषदेत मित्र पक्षकाँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त कराताना तटकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात जातीयवादी पक्षाना दूर ठेवून काँग्रेस पक्षासोबतचा आघाडीचा धर्म पाळला मात्र रायगड, उस्मानाबाद, सांगली यासारख्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने शिवसेने सारख्या जातीयवादी पक्षाशी उघडपणे युती करुन आघाडीचा धर्म पाळला नाही.
नांदेड येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षण मागणीच्या घोषणा देणाऱ्या तरूणांसंबंधी केलेल्या वक्तव्याविरूध्द दै. जनशक्तीच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर तटकरे म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या युवकांची मुख्यमंत्र्यांनी उडवलेली खिल्ली दुर्दैवी असून सकल मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.