फरशी पूल येथे जेसीबीमुळे १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनी गुरुवारी तुटली
पुणे । जेसीबीने तोडलेली महापारेषणच्या १३२ केव्ही वीजवाहिनीची दुरुस्ती रविवारी (दि. २४) रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेतून सुरू असणारा शहरातील मध्यवर्ती व परिसराचा वीजपुरवठा सोमवारी (दि. २५) सकाळी मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत करण्यात आला.
दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे गुरुवारी जेसीबीने महापारेषणची १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडली गेली होती. त्यामुळे रास्तापेठ १३२ केव्ही जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद झाला. परिणामी महावितरणचे सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी व रास्तापेठ हे सहा उपकेंद्रही बंद पडले व शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु महावितरणच्या अभियंते व कर्मचार्यांनी कौशल्याने तांत्रिक उपाययोजना करीत तब्बल ७० ते ८० मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करून या परिसरातील अडीच लाख वीजग्राहकांना इतर उपकेंद्गांतून पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत वीजपुरवठा करण्याचे काम गेले चार दिवस केले. या कालावधीत ११ केव्ही चार वाहिन्यांवर प्रत्येकी एक तासांचे नाइलाजाने भारनियमन करावे लागले होते.
अभियंते, कर्मचार्यांचे कौतुक
भूमिगत १३२ केव्ही वीजवाहिनी तोडल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती व परिसरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे महावितरणसमोर आव्हान होते. पर्यायी व्यवस्थेतून तब्बल ८० मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करून या भागांत वीजपुरवठा करण्यात येत होता. सोबतच गरजेनुसार व कमीतकमी वीजवापर करण्याच्या आवाहनाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला. औद्योगिक ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणावर वीजवापर कमी करून सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा दिला. त्यामुळे भारव्यवस्थापन शक्य झाले. या सहकार्यासाठी सर्व पुणेकरांचे महावितरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे. तसेच सहा उपकेंद्र बंद पडले असतानाच्या आव्हानात्मक स्थितीत अभियंते व कर्मचार्यांनी तांत्रिक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सलग चार दिवस अहोरात्र परिश्रम घेतले त्याचेही मुख्य अभियंता शिंदे यांनी कौतुक केले.
चेन्नईतील तज्ज्ञ कर्मचार्यांनी केले काम
महापारेषणने १३२ केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चेन्नई येथून तज्ज्ञ कर्मचारी व वाहिनी जोडण्यासाठी ’जॉईंट’ मागविले होते. शनिवारी (दि. २३) या वीजवाहिनीच्या दुरुस्तीला सुरवात झाला. रविवारी (दि. २४) रात्री १०.१५ वाजता दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर वाहिनीतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे अडीच पर्यंत महापारेषणचे रास्तापेठ १३२ केव्ही जीआयएस उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर महावितरणने बंद पडलेले सहा उपकेंद्र सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान सुरू करून शहराच्या मध्यवर्ती भाग व परिसरातील वीजपुरवठा मूळ वीजवाहिन्यांवरून पूर्ववत केला.