मध्यवस्तीतील जुन्या वाड्यांसाठी करणार सर्वेक्षण

0

पुणे : मध्यवस्तीत, पेठांमध्ये असलेल्या जुन्या वाड्यांसाठी महापालिका ‘इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेन्ट फिजिबिलिटी रिपोर्ट’ तयार करून घेणार असून, यामुळे राज्यसरकारकडून वाड्यांच्या विकसनाबाबत विकास नियंत्रण नियमावलीत (डीसीरूल) अधिक स्पष्टता येणार असल्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शुक्रवारी मुख्यसभेत सांगितले.

मध्यवस्तीत, पेठांमध्ये असलेल्या वाड्यांच्या विकसनाच्या प्रश्‍नाबाबत विशाल धनवडे यांनी मुख्यसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना वाघमारे यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून जुने वाडे, त्यांचे विकसन या प्रश्‍नावर चर्चा सुरू आहे. त्यासाठी जास्त एफएसआय, वेगळे नियम या सगळ्यासंदर्भात आजपर्यंत चर्चा करण्यात आली, मात्र डीसी रूलमध्येही याविषयी स्पष्टता आली नाही.

यावर्षी 5 जानेवारीला राज्यसरकारने विकास आराखडा मंजूर केला. पाठोपाठ विकास नियंत्रण नियमावलीही मंजूर केली. मात्र महापालिकेने सुचवलेल्या अनेक बाबी राज्यसरकारने नामंजूर केल्या. त्यामध्ये ‘क्लस्टर डेव्हल्पमेन्ट’ हादेखील विषय होता. गावठाण भागातील वाडे विकसित करायचे असतील तर प्रत्येकाला वैयक्तिकरित्या ते शक्य नाही. वाड्यांचे क्षेत्रफळ, तेथे असलेले भाडेकरू आणि अन्यबाबी यांमुळे ते वाडे विकसित करणे मालकाला अथवा विकसकाला परवडणारे नाही. गावठाणाबाबतचे जे नियम डीसी रूलमध्ये सांगितले आहेत, ते प्रत्यक्षात त्या जागेवर वापर करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत मुंबई आणि ठाण्याप्रमाणे जर मध्यवस्ती आणि पेठांमध्ये सर्वेक्षण करून ‘इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेन्ट फिजिबिलीटी रिपोर्ट’ दिला तर त्याबाबतचा नियम राज्यसरकार नव्याने लागू करू शकतो आणि परिणामी डीसी रूल्समध्ये त्याचा समावेश करू शकतो, असे वाघमारे यांनी सांगितले.