कोल्हापूर : कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करत आहे. त्यांनी हा खेळ थांबवला नाही तर येत्या अधिवेशनात आवाज उठवू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला. तसेच, राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर निवडणुकीसाठी तयार रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. एखादा मुद्दा अंगलट आला तर सरकार सोयीचा निर्णय घेत आहे. जशी नवीन माहिती समोर येत आहे तसे सरकार जीआर बदलत आहे, असे टीकास्त्रही पवारांनी सरकारवर डागले.
राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी सुरु
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, शेतकर्यांना सतत कर्जमाफी मिळावी या मताचा मी नाही. पण, शेतकरी नैसर्गिक संकटात असला तर त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. संघर्ष यात्रा काढली म्हणूनच कर्जमाफी मिळाली असे नाही. तर शेतकर्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली, असे सांगून त्यांनी हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका केली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, मी आणि अजितदादा गेल्या 18 जूनपासून संघटनात्मक बांधणीसाठी बाहेर पडलो आहे. संघटनात्मक बांधणीसाठी यापूर्वी वेळ मिळाला नव्हता. नेतृत्वाची दुसरी फळी तयार करण्याचे धोरण ठरवले आहे. दुसरी फळी 28 ते 32 वयोगटातील तयार करत आहोत. जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी करत असताना त्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे. एलबीटी रद्द केल्यामुळे महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
निवडणुकीला तयार रहा!
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे सध्या तरी वाटत नाही. तरीदेखील मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला तयार रहावे. एखाद्या पक्षाला सत्ता मिळाली नाही तर; त्या पक्षाचा जनाधार कमी झाला आहे, असे समजण्याचे काहीच कारण नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.