मध्यावधीसाठी भाजपची चाचपणी सुरू

0

मुंबई । मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय निकाल हाती येतील याची चाचपणी भाजपकडून सध्या सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांनाच जनतेत जाऊन फीडबॅक घेण्याचे आदेश आहेत. त्याचा एक भाग असलेली संवादयात्रा बुधवारपासून सुरू झाली आहे. शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी आग्रही असताना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भाजप सरकार काय काय करत आहे, हे संवाद यात्रेतून भाजपचे नेते शेतकर्‍यांना सांगणार आहेत. भाजपकडून देशभर पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू आहे. अमित शाह सर्व राज्यांच्या दौर्‍यावर जात आहेत. महाराष्ट्रातही ते येतील. त्यावेळी पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.

25 हजार रुपयांचा पगारी माणूस
ज्या ठिकाणी भाजपचे खासदार किंवा आमदार नाहीत, अशा जागांचा सर्व्हे खासगी यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. यासाठी संबंधित मतदारसंघातील प्रत्येक गावात एक पगारी माणूस नियुक्त केला असून त्याला महिन्याला 25 हजार पगार देण्यात आला आहे. ही व्यक्ती महिनाभर त्या गावात राहून प्रत्येक घराचा सर्व्हे करत आहे. यात संबंधित व्यक्तीची आर्थिक, सामाजिक माहिती तर घेईलच, पण राजकीय कलही जाणून घेईल. जूनच्या महिन्यात अमित शाह महाराष्ट्रात येत आहे. ते या सर्व्हेचे निष्कर्ष घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत.

सरकारचे निर्णय जनतेत पोहोचवण्याची धडपड
1995 मध्ये शिवसेना- भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकोपयोगी बर्‍यापैकी चांगली कामे झाली. पण, जनतेपर्यंत ती पोहोचली नव्हती. त्याचबरोबर लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा कामे करूनही लोकांशी तुटलेला संपर्क आणि एकाच वेळी दोन्ही निवडणुका घेण्याच्या निर्णयाने युतीला फटका बसला आणि केंद्राबरोबरच राज्यातही सत्ता गमावण्याची वेळ आली. या वेळी तसे होऊ नये म्हणून भाजप विशेष काळजी घेत आहे.

धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षाची महाआघाडी होण्याची शक्यता
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता लक्षात घेता विरोधी पक्षही कामाला लागला आहे. संघर्षयात्रेच्या माध्यमातून सर्वच विरोधकांची एकजूट झाल्याने मध्यावधी निवडणुका झाल्यास धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षाची महाआघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेणारी राष्ट्रवादी काँग्रेस या वेळी मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने पक्षांतर्गत पातळीवर जोरदार हालचालींना सुरुवात झाली असून येत्या जून महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्याभरापूर्वी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पक्षाचे नेते आणि पदाधिकार्‍यांची एक बैठक झाली. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठीच्या संघर्षयात्रांचा आढावा आणि पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

स्वबळाचा धोका पत्करणार नाही
संघर्ष यात्रेमुळे सर्व विरोधक एकत्र आले असून मध्यावधी निवडणुका झाल्यास विरोधकांची महाआघाडी होण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही विरोधकांची महाआघाडी होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ असूनही स्वबळावर लढण्याचा धोका पत्कारल्याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसला होता. पदरी आलेल्या पराभवानंतर याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने आघाडीसाठी हात पुढे केला आहे.