राज्यातील शेतकर्यांची कर्जमाफी, शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकारापासून वंचित ठेवणे, तसेच शिवसेनेच्या आमदारांच्या विकासनिधीत कपात करणे आदी प्रश्नांवरून सत्तारूढ भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा सुरु आहे. त्यातच शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाच्या आंदोलनावरून शिवसेनेने ऐकवेळ सत्तेतून बाहेर पडू मात्र शेतकर्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत भाजपची राजकिय कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला.
मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणूका लढण्याची भाजपची तयारी असल्याचे जाहीरपणे सांगत शिवसेनेनेला नागपूरी झटका दाखविला. तसेच मध्यावधी निवडणूकांची भाजपकडून तयारीसुरु असल्याबाबतच्या बातम्याही भाजपकडून जाणीवपूर्वक पसरविण्यात आल्या. त्यामुळे आगामी काळात केव्हाही महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. याच चर्चेच्या अनुषंगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने भाजपला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागत यांचे नाव पुढे केले. मात्र त्यास अपेक्षित असा प्रतिसाद आणि राजकिय वातावरण निर्माण होत नाही असे दिसताच मोहन भागवत यांच्या नावाला अडचण होत असेल तर कृषीशास्त्रज्ञ आणि हरीत क्रांतीचेप्रणेते डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. शिवसेनेच्या या राजकिय खेळीवर अद्याप पर्यंत भाजपकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नसले तरी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकांना नजरेसमोर ठेवत आस्ते कदम घेण्याचे धोरण भाजपने स्विकारले. त्यातच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशात भाजपची ताकद वाढविण्यासाठी आणि देशांतर्गंत राजकिय वातावरण जाणून घेण्यासाठी देशव्यापी दौरा सुरु केला. याच दौर्याच्या निमित्ताने तीन दिवसाच्या मुंबई दौर्यावर आलेले अमित शहा काय भूमिका जाहीर करतात याकडे शिवसेनेसह सर्वच राजकिय पक्षांचे लक्ष लागू राहीले. या दौर्यात अमित शहा यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्य मंत्रिमंडळातील भाजप मंत्र्यांच्या बैठका घेतल्या. तसेच या बैठकांमध्ये सर्वांची हजेरी, कान पिचक्या देत पक्ष संघटना वाढीसाठी राज्य सरकार व तसेच पक्षाच्या धोरणाशी संतुलन राखून योजनांची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले. मात्र या बैठकींमध्ये नेमके काय झाले याची वाच्यता कोणीही करू नये यासाठी पक्षाच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्र्यांना तंबी देण्यात आली होती. त्यामुळे या बैठकीत देण्यात येणार्या कान पिचक्या, झाडा झडती याची माहिती काही ठराविक नेत्यांनी नावाची वाच्यता न होऊ देता करून टाकली. अमित शहा यांनीही नेहमीच्या गुप्ततेच्या सवयीनुसार दौर्यातील पहिल्या दिवशी कोणत्याही प्रसारमाध्यमास मोकळी मुलाखत न देता राजकीय हेतू विषयी गुप्तता पाळली. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात गंभीर वातावरण निर्माण करून टाकले. याचा सर्वाधिक धसका शिवसेनेने घेतला होता. त्यामुळे शिवसेनेकडून मोहन भागवतांच्या नावाऐवजी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव पुढे करतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दुसरे एखादे नाव असेल तर त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे सांगत प्रसंगी भाजपशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. यावर अमित शहा यांनीही दौर्याच्या दुसर्या दिवशी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी सुचविलेल्या उमेदवाराचा विचार करू असे सांगत शिवसेनेलाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात गेले काही दिवस सुरु असलेल्या मध्यावधी निवडणूकांच्या चर्चेला पूर्ण विराम देत मध्यावधी निवडणूका लागल्यास त्या लढू आणि जिंकूही अशी स्पष्ट भूमिका जाहीर करत शिवसेनेच्या मध्यावधी निवडणूकीच्या धमकीला अर्थात पाठिंबा काढून घेण्याच्या धमकीला घाबरत नसल्याचे स्पष्ट केले.
या वक्तव्यातून अमित शहा यांनी एका फटकार्यात शिवसेनेच्या आडमुठ्या वारूला फटकारत दुसर्याबाजूला महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसांचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रश्नावरून शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी भाजप मागे हटणार नाही तर त्यास त्यांच्याच भाषेत उत्तर देईल असा संदेशच अमित शहांनी दिला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हलचल माजली नसेल तरच नवल, याविषयीची माहिती उशीराने का होईना उघडकीस येईल तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय सर्वसामान्यांपुढे कोणताही पर्याय नाही. याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नावरही अमित शहा यांनी भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत प्रसंगी शिवसेनेला स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर राजी करू असे जाहीरपणे सांगितल्याने स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारी शिवसेना कोणती भूमिका घेणार आहे, याकडेही तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. त्यातच अमित शहा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आज रविवारी जाण्याचे ठरले आहे. त्यावेळी स्वंतत्र विदर्भाच्या प्रश्नी आणि सत्तेतील सन्मानजनक वाट्यावरून मुंबईचा वाघ गुजरातच्या सिंहासमोर मांजर तर बनणार नाही ना असा प्रश्न संपूर्ण राजकिय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. तूर्त तरी महाराष्ट्रात येवून गुजरातच्या अमित शहा यांनी शिवसेनेच्या भूमिकेच्या नेमकी उलटी भूमिका मांडून चांगलाच राजकिय धुरळा उडवून दिला आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटात भाजप-शिवेसेनेतील वादाचे नाट्यप्रयोग अनेकांच्या दृष्टीने आता टीकेचे विषय बनले असून सत्तेत राहूनही संघर्षाची भूमिका घेणारी शिवसेना आणि डोईजड वाटते आहे तरीही सत्तेत ठेवण्याची भाजपची झालेली अगतिक अवस्था हे वास्तव चित्र आहे. आता विविध मुद्द्यावरुन भाजप-सेनेत वाद असले तरी अपरिहार्यता म्हणूनही ते सत्तेत एकमेकांसमवेत आहेत. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर म्हणा किंवा मध्यावधीची शक्यता अधिक गडद झाली तर सत्तेसाठी असलेच्या या युतीचे भवितव्य काय हेही स्पष्ट हईल. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहाच्या मुंबई दौर्याआड भाजपसह युतीचीही काही गणिते दडली असतील तर आश्चर्य वाटू नये.
गिरिराज सावंत – 9833242586