नांदेड । केवळ शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेना सत्तेत असल्याचे सांगत मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना कधीही सज्ज असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. भाजपच्या गोटातून सतत मध्यवधी निवडणूकिच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. पेरणीचे हंगाम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शेतकर्यांना कर्जमाफी देणार असल्याचे लेखी आश्वासन सभागृहात दिले होते, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
’काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या नौटंकी आंदोलन
कदम सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज (शुक्रवार) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत कदम बोलत होते. नांदेड जिल्ह्याच्या अचानक दौर्याचे कारण विचारले असताना ’शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. पक्षाला अपेक्षित असलेले काम जिल्ह्यात सुरू आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी आजपासून अठरा तारखेपर्यंत खानदेशाच्या दौर्यावर आहे’ अशी माहिती त्यांनी दिली. शेतकरी संपाबाबत बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ’काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या नौटंकी आंदोलन सुरू आहे. दिवसा शेतकर्यांच्या भेटी घेऊन शेतकर्यांना एक सांगायचे आणि दुसरीकडे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे पंतप्रधानांच्या कानात जाऊन सांगायचे अशा लोकांना आंदोलनाचा नैतिक अधिकारच नाही’, असे म्हणत कदम यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
’मी जोशी नाही; की जोतिषी नाही
शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत जातो याची ते वाट पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. ’आम्हाला दुसर्यांच्या सल्ल्याची गरज नसून सत्तेतून बाहेर पडण्यासाठी पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील’, असेही ते म्हणाले. मध्यावधी निवडणुकांबाबत बोलतना ते म्हणाले, ’मी जोशी नाही; की जोतिषी नाही. त्यामुळे मध्यावधी कधी लागणार हे सांगता येणार नाही. परंतु राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांची हेळसांड होत असले आणि सरकार शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला जात नसेल, तर शिवसेना सत्तेला कधीही लाथ मारु शकते.’