पुणे : राज्यात येत्या काही काळात मध्यावधी निवडणुका होण्याबाबत चर्चा सुरू झाली असली, तरी हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पवार सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवादात पवार यांनी हे मत व्यक्त केले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी शेतकर्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर गोंधळ घातला. तसेच, अर्थसंकल्पाच्या प्रतीही जाळल्या. त्यावरून या दोन्ही पक्षांच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आले. राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शेतकर्यांच्या कर्जमुक्तीची मागणी लावून धरली असून, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेच्या या दबावतंत्राला कंटाळून राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याचा भाजपचा व चिार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक वर्षाच्या अखेरीस होत असून, त्यावेळीच राज्यातही मध्यावधी घेण्याबाबतही भाजपचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते.
या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. राज्यात खरोखरच मध्यावधी निवडणुका होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. भाजपच्या दबावतंत्राचा हा भाग आहे. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही, असे पवार म्हणाले.