मध्य प्रदेशमध्ये आरएसएसच्या धर्तीवर काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ

0

नवी दिल्ली । बिहारनंतर मध्य प्रदेशमध्येही भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) धर्तीवर काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ (आरसीएसएस) बनवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या लोकांनाच आरसीएसएसशी जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलम शेर खान यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण देशभरात आरएसएसने आपला विस्तार केला आहे. ते भाजपसाठी काम करतात. पण आमचा संघ हा (आरसीएसएस) हा धर्मनिरपेक्ष लोकांचा संघ असेल.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये धर्मनिरपेक्ष राजकारण संपुष्टात आले आहे. ते लक्षात घेऊन हा संघ तयार करण्यात येणार आहे. आरएसएस ज्यापद्धतीने भाजपसाठी काम करते त्याच धर्तीवर हा संघ धर्मनिरपेक्ष विचारधारा वाढवण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.देशातील धर्मनिरपेक्ष राजकारण संपुष्टात आणण्याचे काम उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. त्यासाठी नव्या युगाची सुरुवात करणे आवश्यक होती. या संघात काम करू इच्छिणार्‍यांना फक्त धर्मनिरपेक्ष विचारधारा अर्थात काँग्रेसची विचारधारा मानणे गरजेचे आहे. ते जेथे आहेत (शिक्षक, डॉक्टर, नोकरी, व्यवसाय आदी) तेथे राहूनच या विचारधारेसाठी काम करू शकतात.

आरसीएसएसबाबत आपण पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. परंतु, आपल्या निर्णयावर हायकमांड खूश होतील, असा विश्वास व्यक्त केला. सध्या या संघाचे कार्यक्षेत्र हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असेल. आरएसएसने देशात मोठ्याप्रमाणात बदल घडवण्याचे काम केल्याचे खान यांनी मान्य केले. आरसीएसएसही त्या पद्धतीनेच काम करेल.