भोपाळ । एकीकडे भाजप केंद्रात सरकार स्थापनेची त्रिवर्षपूर्ती जोरदार साजरी करण्याची तयारी करत असताना मध्य प्रदेशात मात्र वेगळ्याच कारणासाठी पक्षाची चर्चा होत आहे. यावेळी भाजपच्या एका नेत्यावर ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. या प्रकरणात भाजपच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या जनसंपर्क अधिकारी नीरज शाक्य याच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या सायबर सेलकडे भोपाळमध्ये ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून सेक्सरॅकेट चालवले जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन केलेल्या तपासात ऑनलाइन बुकींगच्या माध्यमातून मुली पुरवण्याचे काम एक टोळी करत असल्याचे आढळून आले.
शहरातील उच्चभ्रू वस्तीतील अरोरा कॉलनीतील अशोका सोसायटीत हे रॅकेट कार्यरत होते. पोलिसांनी छापा मारून नऊ जणांना ताब्यात घेतले. या टोळीचा म्होरक्या सुभाष नावाचा व्यक्ती असून तो आता फरार आहे. छाप्या दरम्यान अटक करण्यात आलेला एक व्यक्ती नीरज शाक्य असल्याचे उघड झाले. या सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपचे प्रदेशअध्यक्ष नंदकुमारसिंग चौहान यांनी शाक्यची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पोलिसांनी यावेळी महाराष्ट्र, मेघालयमधून आलेल्या चार मुलींची मुक्तता केली. सायबर सेलचे अधीक्षक शैलेमद्र सिंग चौहान यांनी सांगितले की, ही टोळी नोकरी संदर्भात असलेल्या संकेतस्थळावर आपला बायोडाटा दाखल करणार्या मुलींशी संपर्क करायचे. त्यानंतर नोकरी देण्याच्या बहाण्याने भोपाळला बोलावून त्यांना सेक्सरॅकेटमध्ये अडकवायचे. या संकेतस्थळाची नोंदणी दिल्लीत करण्यात आली होती.