भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील कडता या गावामध्ये ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे विजेची तार जमिनीवर पडली असताना तेथे चरण्यासाठी आलेल्या गायींचा विजेच्या धक्का बसला, त्यातच त्या दगावल्या. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत गायींच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील कमलनाथ यांनी म्हटले आहे. ट्वीट करून कमलनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे.