मंदसौर । मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकर्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून बसेसची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरू झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून दोन शेतकर्यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
आज बंदची हाक
मध्यप्रदेशातील मंदसौर, रतलाम आणि उज्जैनमधील शेतकर्यांचे आंदोलन पाहता, या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय किसान मजदूर संघाकडून उद्या (बुधवार) बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला नाही. गोळीबाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, सरकारकडून कोणतीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली नाही किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
सलग पाच वर्षे केंद्र सरकारकडून कृषी कर्मण पुरस्कार मिळवणार्या मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, अद्याप या शेतकर्यांच्या मागण्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या नसून शेतकरीसुद्धा आपल्या मागण्यावर ठाम असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.