भोपाळ । साथीच्या तापाने ग्रस्त असाल किंवा ह्रदयविकाराने त्रस्त असाल आणि तुम्ही मध्य प्रदेशमध्ये राहणारे असाल, तर तुम्हाला डॉक्टरांच्या दवाखान्यांसमोर लाईन लावण्याबरोबरच ज्योतिषाच्या दुकानासमोरही रांग लावावी लागणार आहे, तिथे ज्योतिषही तुमच्या आजारामागील कारण शोधणार आहेत. असा प्रकार मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयात पाहायला मिळणार आहे.
ज्योतिषतज्ज्ञांची सरकारकडून नियुक्ती
सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात महर्षी पतंजली संस्कृत संस्थेतील ज्योतिषतज्ज्ञांची सरकारकडून नियुक्ती करण्यात येणार आहे. अवघ्या 5 रुपयांचे शुल्क आकारून येथे रुग्णांचे निदान होणार आहे. त्यासाठी एका बाजूला वैद्यकीय डॉक्टर तपासणी करणार आहेत, तसेच ज्योतिषतज्ज्ञही सल्ला देणार आहेत. या ठिकाणाकडील ज्योतिष तज्ज्ञ हे वैदिक कर्मकांड, वास्तू तज्ज्ञ, ग्रहस्थिती, जन्मकुंडली इत्यादी सर्व विषयांचे माहीतगार असणार आहेत. ते येणार्या रुग्णांचे या दृष्टिकोनातूनही निदान करणार आहेत. अशा प्रकारचा ज्योतिषतज्ज्ञाचा पहिला बाह्यरुग्ण विभाग हा सप्टेंबर महिन्यात शिवाजीनगर, योगा सेंटर येथे उभारणार आहे.
सामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
या उपक्रमातून करण्यात येणार्या निदानामुळे सामान्य माणसांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण जोतिषांचा सल्ला घेतील, त्यांचा उपचार घेण्यापेक्षा त्याकडे जास्त कल वाढेल, वैद्यकीय उपचारापासून नागरिक दुरावतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना या उपक्रमाची योग्य आणि विस्तृत माहिती देणे गरजेची आहे. त्यांनी काय करावे, हे त्यांना सांगणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. सरकारच्या या उपक्रमाद्वारे सामान्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे सांगितले आहे.