ठाणे । एल्फिन्स्टन येथे झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने नव्या पुलांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. परंतु, कल्याण व त्यापुढील स्थानकांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहाड, आंबिवली तसेच टिटवाळा रेल्वे स्थानकांवरील जीपीएस घड्याळे व इंडिकेटर बंद पडले आहेत. कल्याण रेल्वे जंक्शनवरही जीपीएस घड्याळे अनेकदा चुकीची वेळ दाखवताना आढळून आले आहे. काही स्थानकांवरील रेल्वे कॅण्टीनही केवळ शोभेपुरती उरले असून एटीव्हीएम वारंवार बिघडत असल्याने प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका झालेली नाही.
जीपीएस घड्याळ बंद
मुंबई व उपनगरांमध्ये कसारा व कर्जतसारख्या दूरच्या अंतरावरून येणार्या सुमारे 10 लाख प्रवाशांना या गैरसोयींचा फटका सोसावा लागतो. त्यामुळे सुरक्षित प्रवासासोबतच या सुविधा तातडीने प्रवाशांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी वाढीव निधी मिळावा, यासाठी प्रवासी संघटनांनी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या आंबिवली येथे लष्करातर्फे रेल्वेपुलाचे काम होत आहे. तरी तिथे जीपीएस घड्याळ बंद अवस्थेत दिसून येते. तशीच परिस्थिती शहाड व टिटवाळा येथेही आहे. कल्याणसारख्या मोठ्या जंक्शनवरही जीपीएस घड्याळे अनेकदा चुकीची वेळ दाखवताना आढळून आले आहे.
रेल्वेची कॅण्टीन बंद
कसारा व कर्जत येथून येणार्या प्रवाशांचा दररोज प्रवासासाठी लागणारा अवधी जास्त असतो. त्यामुळे प्रवासात उपहारगृहाची गरज त्यांना भासते. परंतु, कसारा, खर्डी, आटगाव, वासिंद व शहाड येथील रेल्वेची कॅण्टीन बंद आहेत. शहाडवगळता इतर सर्व कॅण्टीन अनेक वर्षांपासून बंद आहेत. अधिकृत कॅण्टीन बंद असल्याने प्रवाशांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळणारे खाद्यपदार्थ विकत घेण्याची वेळ येते. त्यामुळे ही कॅण्टीन तातडीने सुरू करावीत, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वेप्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी केली आहे. प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने लोकलचे पायदान व प्लॅटफॉर्मदरम्यानच्या जीवघेण्या पोकळीत सापडून अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत. तरी कल्याणच्या पुढील स्थानकांवर ही पोकळी अद्याप तशीच आहे. ही उंची वाढवण्यासाठी जून 2018 उजाडेल, असे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी 6 महिने हा धोका पत्करूनच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.