मध्य रेल्वेच्या 11 कर्मचार्‍यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

भुसावळ : मध्य रेल्वेतील 11 कर्मचार्‍यांना जीएम संरक्षा पुरस्काराने गौरवण्यात आले. महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्याहस्ते नुकतेच पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. त्यात भुसावळ विभागातील तीन, मुंबई विभागातील तीन, नागपूर विभागातील दोन, पुणे विभागातील दोन आणि सोलापूर विभागातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे.

सतर्कतेबद्दल कामाचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात, जुलै/ऑगस्ट 2022 या महिन्यात कर्तव्यादरम्यान कर्मचार्‍यांच्या सतर्कतेचा, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात संरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाची दखल घेवून हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रोख दोन हजारांचा समावेश आहे. भुसावळ विभागातील कृष्ण वनारे, निलेेश तुळशीराम इंगळे व मोहम्मद इद्रीस शेख ईस्माईल यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. रेल्वे कर्मचार्‍यांची सतर्कता इतरांना प्रेरणा देईल, असे जीएम अनिलकुमार लाहोटी म्हणाले.

यांची होती उपस्थिती
अतिरीक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग, मुख्य संरक्षा अधिकारी पीयूष कक्कर, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता ए.के.गुप्ता, प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन.पी.सिंग, आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.