मुंबई । रेल्वे स्थानकातील सेवांचा लाभ घेताना प्रवाशांनी जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा, या उद्देशाने मध्य रेल्वेवरील आणखी पाच स्थानकांवर कॅशलेस सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दादर, माटुंगा, भायखळा, कल्याण, अंबरनाथ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. तिकीट खिडक्यांवर, रेल्वे हद्दीतील वाहन पार्किंग सुविधा, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्स, विश्रामकक्षांसाठी शुल्क देण्यासाठी पीओएस यंत्र, पेटीएम, स्कॅन कोड इत्यादी सुविधा येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्यात उपलब्ध केल्या जातील. या सुविधा निर्माण करतानाच रोख रकमेचा पर्यायही प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.