मनजीत कौर यांनी शोधले कचर्‍यातून ‘सोने’

0

प्लास्टिकसह कचर्‍यावर प्रक्रिया करुन विविध वस्तूंचे उत्पादन

लघुउद्योग उभारल्यानंतर बेरोजगारांच्या हाताला मिळेल काम

जळगाव (किशोर पाटील ) : जिद्द असली की, जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. याच वाक्याला अनुसरुन समाजसेवेची धडपड असलेल्या अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या पत्नी मनजीत कौर मतानी यांनी देशातील प्लास्टिकसह इतरही कचर्‍याच्या समस्येवर पर्याय शोधला आहे. यामुळे कचर्‍यावर संशोधन करुन त्यापासून टाईल्स, पेपर वेटसह अनेक वस्तूंचे उत्पादन करता येणार आहे. या लघुउद्योगामुळे कचर्‍याची समस्या तर समूळ नष्ट होईलच शिवाय त्यामुळे तालुक्यासह गावागावात प्रत्येकाच्या हाताला काम मिळून बेरोजगारीसह प्रदूषणासारख्या संकटावरही मात करता येणार आहे. देशात कचर्‍यावर झालेले हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा मनजीत कौर मतानी यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना केला आहे.

मनजीत कौर यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे. समाजासाठी देणे लागतो या भावनेतून मनजीत कौर यांना समाजासाठी खूप काही करण्याचे स्वप्न आहे. प्रत्येकाला रोजगार मिळाला, महिलांचे सक्षमीकरण झाल्यास देशातील सर्व समस्या नष्ट होतील, असे त्यांचे म्हणणे असून त्यानुसार त्यांची समाजकार्याची धडपड सुरु आहे.

समाजसेवेच्या झपाटलेपणातून संकल्पना आली समोर
काही दिवसांपूर्वी अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांची नागपूर येथून जळगावला बदली झाली. नवीन गाव नवीन घर याप्रमाणे मतानी परिवारासाठी सर्व नवीन होते. निवासस्थानावर आल्यावर याठिकाणी प्रचंड कचरा तसेच घाणीचे साम्राज्य पसरले होते. स्वच्छतेची आवड असल्याने मनजीत यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी कामगारांसह सर्व परिसर स्वच्छ करुन घेतला व कचरा एका ठिकाणी जमा केला. काही दिवस लोटल्यावरही कचरा घेण्यासाठी गाडी आली नाही. कचर्‍याचा ढीग मनजीत यांच्या मनाला खटकत होता. समाजसेवेच झपाटलेपण अंगी असलेल्या मनजीत यांना कचर्‍यावर प्रक्रिया करुन काही करता येईल काय? जेणेकरुन प्रत्येकाला रोजगारही मिळेल व कचर्‍याची समस्याही संपेल असा विचार मनात आला.

शासनाच्या मदतीमुळे प्रत्येक गावात लघुउद्योग
शासनाच्या मंजुरीनंतर संशोधन सर्व जगासमोर येईल. देशासमोरील प्रदूषण व बेरोजगारी या दोघा संकटांवर मात करता येणार आहे. शासनाकडून मदत मिळाल्यास पिपल्स’स पीस फाऊंडेशन अंतर्गत प्रत्येक गावात लघुउद्योग उभारुन त्यावर प्रक्रिया करता येईल व त्यापासून वस्तूंचे उत्पादन करुन त्या बाजारात विकता येतील. त्याव्दारे प्रत्येकाला काम मिळेल, तसेच प्रदूषणाचे प्रमूख कारण असलेला प्लास्टिक तसेच कचर्‍याचीही योग्य पध्दतीने विल्हेवाट लागणार आहे.

आयआयटी पतीने शोधला समस्येवर मार्ग
अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे बनारस विद्यापीठात आयआयटीचे शिक्षण झाले आहे. मनजीत यांनी कचर्‍यापासून काही उत्पादन करता येईल का, याबाबत पती लोहित मतानी यांच्याशी चर्चा केली. मतानी यांनी कचर्‍यावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध वस्तू बनविण्याचा मार्ग शोधला. मतानी दाम्पत्याने संशोधनाबाबत शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थीही तयार झाले. विद्यार्थ्यांनी कचरा, प्लास्टिकवर प्रक्रिया करुन त्यापासून टाईल्स, पेपरवेट सारख्या वस्तू बनविल्या. तसेच कचर्‍यावर प्रक्रिया करुन त्यापासून अनेक वस्तू बनविता येतील, असे प्रयोगातून सिध्द झाले. यानंतर मनजीत कौर यांनी दिल्ली येथे या संशोधनाच्या पेटंटसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कचरा सहज उपलब्ध होतो. शिक्षणाची गरज नाही, कुणीही कौशल्य प्राप्त करुन काम करु शकेल. या उद्योगामुळे पिपल्स’स पीस फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुले, वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला तसेच तृतीयपंथी हे देखील रोजगाराच्या प्रवाहात येतील. शासनाची मदत मिळाल्यास प्रदूषण व बेरोजगारी समूळ नष्ट करण्यास मदत होईल. तसेच स्वच्छ भारत अभियानासाठी संशोधन मोठी उपलब्धी ठरेल.

मनजीत कौर मतानी