मनपाकडून काळ्या यादीत,‘प्रजा’चे मुख्यमंत्र्यांना साकडे

0

मुंबई । माहिती अधिकारातून महानगरपालिकेच्या कारभारातील अनेक चुकीच्या गोष्टी बाहेर काढणार्‍या प्रजा फाऊंडेशनला मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. याविरोधात प्रजा फाऊंडेशनने विरोध करत महापालिकेच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, प्रजा फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना एक अर्ज केला आहे. बेकायदेशीरपणे परवाने देणे आणि काही ठराविक लोकांवर मेहेरनजर करणे आम्हाला मान्य नाही. धोरणात मनमानी बदल करणे किंवा नागरीक केंद्री नसलेले धोरण आम्ही मान्य करणार नाही. महापालिका ज्या निष्काळजीपणे काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही, असे या संस्थेचे म्हणणे आहे.

विविध संस्थांचा ‘प्रजा’ला पाठिंबा
पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टचे संस्थापक आणि विश्‍वस्त माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अ‍ॅण्ड नेटवर्किंगचे अध्यक्ष माजी महानगर पालिका आयुक्त डी.एम. सुखटणकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त (सीआयसी) शैलेश गांधी (आरटीआय कार्यकर्ते), माजी टाइम्स ऑफ इंडिया अर्थ संपादक सुचेता दलाल (संस्थापक व विश्‍वस्त मनीलाईफ फाउंडेशन) आणि निताई मेहता (संस्थापक प्रजा फाउंडेशन) यांनी या अर्जावर स्वाक्षरी केली आहे.

सौजन्याने वागण्याची विनंती
महापालिकेच्या कामकाजात आणि कामगिरीत पारदर्शकता यायला हवी आहे. यासाठी आमची मागणी आहे की स्वयंप्रेरणेने सर्व माहिती जाहीर करावी. लोकशाही प्रक्रियांचे बारकाईने पालन व्हावे, असे मत महापालिकेचे माजी आयुक्त डी. एम. सुखटणकर यांनी मांडले. या अर्जात त्यांनी जे लोक कायदा आणि नियमांचे उल्लंघन करतात, असंसदीय पद्धतीने काम करतात, ज्यामुळे कमला मिल आग, जीवघेणे अपघात आणि मोकळ्या जागांवर अतिक्रमण असे प्रकार होतात, अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.