मुंबई । गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) या भारतातील रिअल इस्टेटमधील अग्रणीच्या विकासक कंपनीने, बागायती कचर्याचे पर्यावरणपूरक, इंधनासाठी उपयुक्त अशा तुकड्यांमध्ये (ब्रुकेट) परिवर्तन करण्यासाठी प्लांट उभारण्याचे जाहीर केले आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या महत्त्वाकांक्षी सीएसआरच्या ध्येयाचा आणि गोदरेज ग्रूपच्या गुड अँड ग्रीन उपक्रमाचा हा भाग आहे, यामुळे भारतात शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील एमसीजीए के वेस्ट वॉर्डमध्ये प्लांट उभारला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने (एमसीजीएम) या प्रकल्पासाठी तब्बल 5,000 स्क्वेअर फुटांची जमीन दिली आहे. या प्लांटमध्ये दर दिवशीचा 5 टनांचा जैविक कचरा वेगळा केला जाईल आणि या कचर्यावर प्रक्रिया करून इंधनासाठी उपयुक्त अशा तुकड्यांचे (ब्रुकेट) उत्पादन केले जाईल. गोदरेज प्रॉपर्टीज आणि ग्रीन रूट्सद्वारे चालणार्या प्रक्रियांतून या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल.
2020 पर्यंत शून्य जैविक कचरा
2020 सालापर्यंत जैविक कचरा शून्य व्हावा असे महत्त्वाकांक्षी ध्येय गोदरेजने समोर ठेवले आहे, आणि ग्रूपच्या उपक्रमाचा भाग म्हणून धोक्याच्या आणि घन कचर्याचे प्रमाण कमी करण्यावर तसेच कचर्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, याशिवाय आमच्या साइटवरून कुठल्याही प्रकारचा कचरा महापालिकेच्या कचर्याच्या ग्राउंडवर पाठवला जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. भारतातील शहरांमध्ये सध्या घन कचर्याच्या व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न उभा आहे, नावीन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजनांना प्रोत्साहन देत आहोत.
विकासासाठी महत्त्वाचा प्लांट
गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिका आणि ग्रीन रुट्सबरोबर संलग्नितपणे काम करता येत असल्याने आम्ही अतिशय आनंदित झालो आहोत. शाश्वतता हीच यशाची गुरुकिल्ली आहे हा आमच्या कंपनीचा दृष्टिकोन आहे आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन प्लांट त्याचाच भाग आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे, शहरी विकासात शाश्वतता आणि पर्यावरणपूरक सजगता महत्त्वाच्या असून, हा प्लांट म्हणजे त्याच दृष्टीने टाकलेले पाऊल आहे.