मनपाचा 883 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

0

जळगाव । महापालिकेत सन 2018-19 या आर्थिक वर्षांचे 883 कोटी 1 लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूरीनंतर विशेष महासभेत मंजूरीसाठी आजस्थायी सभापती ज्योती इंगळे यांनी सादर केले. या अंदाजपत्रकांवर चर्चा होवून महासभेने मंजूरी दिली. याप्रसंगी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. नगरसेवकांनी शहरात परिवहन सेवा नसतांना त्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावर प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी शहरात खाजगी बस सेवा सुरू करण्याबाबत शासनाकडून परवानगी मागितली असल्याचे सांगितले.

करवाढ स्थायीत फेटाळली
सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात स्थायी समितीने 137 कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची रक्कम 883.01 कोटींवर गेली आहे. दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून त्यांच्यावर करवाढ लादणे योग्य नसल्याचे कारण देत अंदाजपत्रकात प्रशासनाने सुचवलेली सर्व प्रकारची करवाढ स्थायी समितीने फेटाळून लावली होती. हे सुधारीत अंदाजपत्रक स्थायी सभापती ज्योती इंगळे यांनी महासभेत मांडले.

महिला सक्षमीकरणावर तरतूद नसल्याचे मत
नगरसेविका आश्‍विनी देशमुख यांनी सभागृहात 52 टक्के महिला सदस्य असतांना अंदाजपत्रकात महीला सक्षमीकरणांच्या खर्चांची तरतुद नसल्याने नाराजी व्यक्त केली. आश्‍विनी देशमुख यांनी घनकचरा प्रकल्प, उद्योग वाढीसाठी जळगाव मॅग्नेटीक, मनपा इमारतीवर वीजकपातीसाठी सोलार टॉपचा पर्याय सुचविला. पृथ्वीराज सोनवणे यांनी अमृतच्या माध्यमातून 650 कोटी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत करवसुलीत घट म्हणजे प्रशासनाने अपयश असल्याचे सांगीतले. भाजप गटनेते सुनिल माळी यांनी जळगावात परिवहन सेवा सुरु करण्याची तरतुद तर रविंद्र पाटील यांनी आरक्षित जमिनींच्या संपदनासाठी निधीची तरतुद तसेच उज्वला बेंडाळे यांनी ग्रंथालय, अभ्यासिकांसाठी तरतुदीची मागणी केली. अनंत जोशी, नितिन नन्नवरे व ज्योती चव्हाण यांनीही मते मांडली.

गाळेधारकांचे निवेदन
अंदाजपत्रकाची सभा सुरु होताच मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे व कोअरकमेटीने महापौरांना निवेदन दिले. त्यात त्यांनी महपालिका प्रशासनाने गाळेधारकांना दिलेली 5 वर्षाच्या भाड्याची अन्यायकारक बिले रद्द करुन ती सुधारीत करून 31 मार्च 2018 पूर्वी हा विषय संपुष्टात आणावा अशी मागणी केली आहे. तसेच शाहु नगर मार्केटमधील 112 गाळेधारकांच्या मुदतवाढीचा सन 2005 च्या ठरावाची अंमलबाजवणी करण्याची मागणी केली.

शौचालये मोकळी करणार
महीला सक्षमीकरणासाठी निधी . तसेच महापालिका इमारतींवर सोलार सिस्टम बसविण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून महापालिकेस निधी व हुडको कर्जफेडीसाठी गाळे व खुल भुखंडा करातून उत्पन्न येण्याची आशा व्यक्त करीत शहरात परिवहन सेवा सुरु करता येत नसल्याने खासगी बससेवा सुरु करण्यासाठी शासनाला परवानगी मागीतल्याचे तसेच मार्केटमध्ये शौचालयांच्या जागी केलेली दुकाने काढून ती मोकळी करणार असल्याचेही आरुक्त निंबाळकरांनी सांगीतले.

खडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहीणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री, माजी मंत्री एकानाथराव खडसे, विनोद देशमुख व मुविकोराज कोल्हे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मुविकोराज कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.