मनपाची सुरू आहेत 50 कोटी रुपयांची अनावश्यक कामे

0

मुंबई । मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणार्‍या कामांचा आढावा घेतला, तेव्हा यातील बहुतांश कामे आवश्यकता नसताना सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. ही सर्व कामे सुमारे 50 कोटी रुपयांची आहेत. हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला, तेव्हा महापालिका आयुक्तांनी ताबडतोब ही कामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत तसेच ही कामे थांबवून कररूपाने पैसे भरणार्‍या नागरिकांचा पैसा वाचवण्याचे धोरण यानिमित्ताने आयुक्ताने स्वीकारले आहे.

मागच्या वर्षी 90 कोटींची कामे थांबवलेली
चालू वर्षांच्या प्रारंभी रस्ता दुरुस्तीची ही कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, 1 ऑक्टोबरपासून मनपाने अशा कामांचा आढावा घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणाच्या अंतर्गत हा आढावा घेण्यात आला. मागच्या वर्षी अशाच प्रकारे मनपा आयुक्तांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला होता, तेव्हाही 90 कोटी रुपयांची कामे थांबवण्यात आली होती. मनपाने अपयशी ठरलेला पेव्हर ब्लॉकचा प्रयोग पाहून ठिकठिकाणचे पेव्हर ब्लॉक काढण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे मनपा असा निर्णय घेत असताना दुसरीकडे अनावश्यक रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. हा विरोधाभास सध्या मनपामध्ये पाहायला मिळत आहे.

फोर्ट भागात कुठेही पावसाचे पाणी साचत नाही. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, हुतात्मा चौक, इरोस सिनेमा आदी भागांत सध्या मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा निचरा होणार्‍या कामांची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच हॉटेल ताज येथेही ही कामे सुरू आहेत. या सर्व ठिकाणी कधीच पावसाचे पाणी तुंबत नाही. त्यामुळे ही कामे सुरू करून कोणतेही ईस्पित साध्य होणार नाही तसेच त्याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे ही काम ताबडतोब बंद करण्याची आवश्यकता आहे, असे पालिका आयुक्ता अजोय मेेहता यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या कामांचा आढावा घेऊन ही कामे थांबवण्याचा निर्णय घेतला. या कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. मागील आठवड्यात यासाठी एकामागो एक बैठकांचा रतीब लावून सुमारे 50 अशी कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रस्ता दुरुस्तीची कामेही थांबवली
यासोबत बर्‍याच ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली असूनही त्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे हा आढावा घेत असताना दिसून आले. जर एखादा रस्ता उखडला असेल किंवा खड्डेच खड्डे पडले असतील, तर त्याची पुनर्बांधणी करणे योग्य असते. मात्र, काही ठिकाणी थोड्या थोडक्या दुरुस्तीच्या कामासाठी मोठमोठी कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या कामांचाही यानिमित्ताने आढावा घेण्यात आला. म्हणून ही रस्ता दुरुस्तीची कामेही बंद करण्यात आली.