मनपाच्या उदासीन धोरणामूळे रुग्णालयात डॉक्टर नाहीत

0

नवी मुंबई । मनपाच्या उदासीन धोरणामूळे आजही रुग्णालयात अपेक्षित डॉक्टर नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने कामकाज होत नाही. त्यामुळे याचा परिणाम रुग्णावर होत असल्याने रुग्णांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याविरोधात येत्या महासभेत नगरसेवक मनोज हळदणकर आरोग्य प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाने 2000 मध्ये वाशी येथे 300 खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय सुरू केले आले. तेथे डॉक्टरांची कमतरता जाणवत असतानाच नेरुळ व ऐरोली येथे 100 खाटाचे रुग्णालय सुरू करण्यात आले. नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालय तीन वर्षापासून सुरू झाली. परंतु काही आजारावर बाह्य तपासणी व्यतिरिक्त आजपर्यत काहीही साध्य झाले नाही. याचे कारण म्हणजे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न होणे व साहित्य पुरवठा न केल्यामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सांगितले.

मनपाने डॉक्टरांना चांगला पगार देण्याची मागणी
मनपाच्या आरोग्य विभागात काम करून काय फायदा? असा प्रश्‍न एक राजीनामा देणारे त्वचारोग तज्ज्ञ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मनपाने जर चांगला पगार दिला तर आम्ही कुठेही काम करणार नाही असेही त्या डॉक्टरांनी निक्षून सांगितले. भविष्यात असे वातावरण राहिले तर सरकारी रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर मिळणे दुरापास्त होऊन जाईल. म्हणून मनपा आयुक्त व शासनांनी यावर योग्य तोडगा काढून अपेक्षित वेतन देण्याची गरज असल्याचे शिव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत उंडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता, हा विषय मोठा असल्याने मी भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा प्रशासनाने आजतागायत कंत्राटी पद्धतीवर विविध विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर भरती करण्याचा प्रयत्न केला. परंतु या डॉक्टरांना महिन्याकाठी पगार म्हणूंन 60 हजार रुपयेच देत असल्याने मनपा रुग्णालयात येण्यास कुणीही धजावत नसल्याचे चित्र आहे. जर याच डॉक्टरांनी बाहेर व्यवसाय केला तर त्यांना लाखो रुपये मिळत आहेत. त्यामुळे मनपा देत असलेला पगार वाढविण्याची गरज असल्याचे एक डॉक्टरांनी सांगितले. कंत्राटी पद्धतीने काम व त्रास यामुळे कुणीही मनपाच्या आरोग्य विभागात काम करत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागातील आस्थापनेवर असलेले अस्थिव्यंग तज्ज्ञ, त्वचा तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, सर्जन, मेडिसीन, इएनटी तज्ज्ञ असे 15 तज्ज्ञ डॉक्टर राजीनामा देऊन खाजगी ठिकाणी कार्यरत झाले आहेत. याचे कारण मनपा प्रशासन कायम असणार्‍या डॉक्टरांना मनपा व्यतिरिक्त इतर ठिकाणी काम करून न देणे. त्याच बरोबर वेतन कमी असणे. मनपा जे पगार देते त्यामध्ये आमच्या गरजही पूर्ण होत नाही.