मनपाच्या उद्यान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सेलिब्रिटींचीही लाभली उपस्थिती

0

मुंबई । मुंबई महापालिकेकडून मागील 22 वर्षे उद्यान प्रदर्शन आयोजिक करण्यात येते. यंदाच्या वर्षी जलप्रदूषण हा खास विषय या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्याकरता कृत्रिम नदीही बनवण्यात आली होती. यंदाच्या उद्यान प्रदर्शनाला मोठ्या संख्येने सेलिब्रिटीज यांची उपस्थिती लाभली होती. मागील तीन दिवसांत सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी याला भेट दिल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या उद्यान प्रदर्शनाला भेटी देणार्‍या सेलिब्रिटीजमुळेही या ठिकाणी भेटी देणार्‍या नागरिकांची गर्दी वाढली.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात शुक्रवार 9 तारखेपासून तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात या वर्षी जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली होती तसेच पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव)देखील या नदीमध्ये होती. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अ‍ॅनाकोंडा यांसारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात होत्या.

रविवारी 50 हजारांहून अधिक नागरिकांची भेट
शेवटच्या दिवशी अर्थात रविवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुमारे 50 हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार, तर दुसर्‍या दिवशी सुमारे 40 हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 25 हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

कलाकारांनी लावली हजेरी
या प्रदर्शनाचे हे 23 वे वर्ष आहे. परंतु, आजवर कधीही सेलिब्रिटीजना न बोलवणार्‍या पालिका प्रशासनाने या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजना निमंत्रण दिले होते. परंतु, प्रदर्शनाला उपस्थित राहू शकत नसल्याने अमिताभ बच्चन यांनी पत्र पाठवून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या, तर अभिनेते ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल, वैशाली सामंत आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महापालिकेच्या कर्मचार्‍यांचे कौतुक केले.