मुंबई । दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईला सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करणार्या मुंबई महापालिकेच्या जलविभागाचा देशपातळीवर गौरव करण्यात आला. केंद्रीय जलसंसाधन मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्या हस्ते दिल्ली येथे पालिका जलविभागाचे तीन पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले. युनेस्को व केंद्र सरकारच्या वॉटर डायजेस्टद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापालिकेकडून मुंबईला प्रतिदिन 3750 दशलक्ष लीटर पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने मुंबई महापालिकेला तीन पुरस्कार प्रदान केले.
पहिला ’बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट’ या गटातील पुरस्कार ’गुंदवली – कापुरबावडी – भांडूप संकुल’ दरम्यानच्या जलबोगद्यासाठी, दुसरा ’वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर’ या गटात पांजरापूर येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी तर तिसरा ’बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट’ या गटात भांडूप येथील 90 कोटी लीटर क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्राला देण्यात आला. या पुरस्कारांमुळे महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. ‘वॉटर डायजेस्ट‘ पुरस्कारांसाठी देशभरातील पाणीपुरवठा प्रकल्पांचा विचार करुन पाणी पुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सात सदस्यांच्या परिक्षक मंडळाद्वारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली होती. या परिक्षक मंडळात निरी, आय.आय.टी, टेरी, खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आय. आय. टी., केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.
वॉटर डायजेस्ट’ पुरस्कार प्रदान सोहळा
महापालिका प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त रमेश बांबळे यांनी हे पुरस्कार पाणी पुरवठा प्रकल्प खात्याचे कार्यकारी अभियंता सुधाकर हांडे, संबंधित सहाय्यक अभियंता राजेंद्र खानविलकर व यतिश रांदेरिया यांनी स्वीकारले. दरम्यान, पाणी पुरवठा क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाणार्या ’वॉटर डायजेस्ट’ पुरस्कार प्रदान सोहळ्यास केंद्रसरकार व राज्य सरकारांमधील वरिष्ठ अधिकार्यांसह पाणी पुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.