भूसंपादनावर जादा रक्कम जाणार असल्याने ठराव केला होता नामंजूर ; भूसंपादनाची परस्पर रक्कम देण्याच्या हालचाली
जळगाव: पिंप्राळा येथील जागेवर शाळा,आणि क्रीडांगणचे आरक्षण आहे. या जागेचे भूसंपादन करताना चुकीची आकारणी करण्यात आली. जवळपास 17 ते 18 कोटी रक्कम द्यावी लागणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडला असता.त्यामुळे भूसंपादनाचा प्रस्ताव दि.7 डिसेंबर 2018 च्या महासभेत नामंजूर करण्यात आला.मात्र महासभेत करण्यात आलेला ठराव चुकीचा ठरवून भूसंपादनाची रक्कम हडप करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती स्थायी सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी दिली.मनपाच्या तिजोरीतून पैसा जायला नको हीच भूमिका असल्याचेही त्या म्हणाल्या.
पिंप्राळा शिवारातील जागेचे भूसंपादन करण्यासाठी भूसंपादन विभागाने आकारणी करुन जवळपास 17 ते 18 कोटी रक्कम निश्चित केली. यावर मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे आकारणीबाबत आक्षेप नोंदवून हरकत घेतली. यावर विभागीय आयुक्तांनी मूल्यांकन करुन दुरुस्ती करावी असे आदेश दिले होते. त्यावर नगररचना सहाय्यक संचालकांनी पाहणी करुन भूसंपादनासाठी 3 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सुचविले, मात्र भूसंपादन विभागाने यातील त्रुटींची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने 3 जानेवारी 2019 ला भूसंपादनाचा ठराव नामंजूर करण्यात आल्याबाबत जिल्हाधिकार्यांना आणि दि.23 ऑगस्ट 2019 ला प्रधान सचिवांना कळविण्यात आले होते. मात्र काहीजण अधिकार्यांना हाताशी धरुन मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
भूसंपादनाची चुकीची आकारणी
भूसंपादनावर जवळपास 17 ते 18 कोटींची चुकीची आकारणी करण्यात आल्याने ठराव क्रमांक 58,59 आणि 60 क्रमांकाचा ठराव दि.7 डिसेंबर 2018 रोजी महासभेत नामंजूर केला.मात्र हा ठराव नामंजूर करणे कसे चुकीचे आहे हे ठरविण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा अॅड.शुचिता हाडा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.