मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये व्हेंटिलेटर्ससह अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे. प्रसूतिगृहांमध्ये व्हेंटिलेटर्ससह अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर झाली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेची 27 प्रसूतिगृहे आहेत. या प्रसूतिगृहांमध्ये प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात सेवांबरोबर नवजात शिशू कक्ष व बालरोग आंतररुग्ण विभागाची सुविधा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्येक रुग्णालयात अतिदक्षता विभाग असणे सक्तीचे आहे. मात्र, पालिकेच्या 27 पैकी एकाही प्रसूतिगृहामध्ये अतिदक्षता विभाग उपलब्ध नाही.
खासगी रुग्णालयांनाही प्रसूतिगृहे जोडणार
प्रसूतीच्या वेळी अथवा नंतर एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्ण महिलेस किंवा तिच्या बालकाला अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. या परिस्थितीत अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर असलेली रुग्णालये नेमकी कुठे आहेत याची माहिती नसल्याने महिला व तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये व्हेंटिलेटर्ससह अतिदक्षता विभाग सुरू करावा किंवा या सुविधा असलेल्या महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांना त्या परिसरातील प्रसूतिगृहे संलग्न करावीत, अशी मागणी सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. सदर ठरावाची सूचना पालिका सभागृहाने मंजूर केली आहे. पालिका सभागृहात प्रसूतिगृहांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी मंजूर झाल्याने गरोदर महिला व नव्याने जन्मलेल्या बालकांना दिलासा मिळणार आहे.