मनपाच्या मंड्यांतील महागणार मटण,मासे

0

मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या मंड्यांच्या अनुज्ञापन शुल्क आणि गाळ्यांचे भाडे यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे महापालिका प्रशासनाने सुचवले आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मंड्यांमधील शुल्क दरवाढ दुप्पट केली जाणार असल्याने त्याचा थेट परिणाम यामधून विकल्या जाणार्‍या वस्तू, मांस, मटण, मासे इत्यादींच्या दरांमध्येही वाढ होणार आहे. बाजार विभागाच्या मंड्यामध्ये वसूल करण्यात येणार्‍या वार्षिक अनुज्ञापन शुल्कात सन 2000 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. या शुल्काव्यतिरिक्त घाऊक बाजारसंबंधित व बाह्य मांस संबंधित इतर बाबी अंतर्भूत आहेत. 2000 नंतर 16 वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत महागाईचा दर वाढलेला आहे. महापालिका मंड्यांच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शुल्क आणि भाडे दरामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने पालिका प्रशासनाने शुल्क व भाडेवाडीचा प्रस्ताव विधी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला आहे.

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मंड्यांमधील बाजारात कोणतीही वस्तू, मांस, कोंबड्या व इतर वस्तू विकण्यासाठी, दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी, अनुज्ञापत्र वारसांच्या नावे हस्तांतरण करण्यासाठीच्या शुल्क दरात दुप्पट वाढ सुचवली आहे. या शुल्क दरवाढीचा प्रस्ताव विधी समिती व त्यानंतर पालिका सभागृहात मंजूर झाल्यास त्यानंतर येणार्‍या महिन्यांपासून दर वाढ लागू केली जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे पालिका मंड्यांमध्ये विकल्या जाणार्‍या मांस, कोंबड्या, मासे तसेच इत्यादी सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे. दरम्यान प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव दुप्पट दरवाढीचा असल्याने विधी समितीमध्ये यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.