मनपाच्या मुख्याधापकांसह शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

0

शाळा क्रमांक 11 आणि 32 मध्ये उपायुक्तांनी केली पाहणी


जळगाव: सुप्रिम कॉलनीतील मनपाच्या शाळा क्रमांक 11 व 32 मध्ये उपायुक्त अजित मुठे यांनी अचानक भेट देवून तपासणी केली. यावेळी शाळेचा परिसर अस्वच्छ दिसून आला.त्यामुळे येथील मुख्याधापकासह शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

शाळेचा परिसर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. परंतु उपायुक्तांनी शाळा क्रमांक 11 व 32 मध्ये पाहणी केली असता याठिकाणी अस्वच्छता आढळून आली. अस्वच्छतेमुळे येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने उपायुक्त मुठे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येथील मुख्याधापकासह शिक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहे.

शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी

शाळांमधील पोषण आहार वाटपासंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 15 फेब्रुवारीपर्यंत पोषण आहार वाटपाचे काम सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी असलेल्या प्लेट्सची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित मुलांना प्लेट उपलब्ध होईपर्यंत पोेषण आहार संपलेला असतो अशी तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात बिल मंजुर करण्यापुर्वी तपासणी करण्याची सूचना उपायुक्त मुठे यांनी केली आहे.

घरकुल घोटाळ्यातील दोषी विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची मागणी

घरकुल घोटाळ्यातील विद्यमान नगरसेवक भगत बालाणी,सदाशिव ढेकळे,दत्तात्रय कोळी,लताताई भोईटे व स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना धुळे विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तसेच त्यांना कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे संबंधित पाचही विद्यमान नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. यावर मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,नितीन लढ्ढा,प्रशांत नाईक यांची स्वाक्षरी आहे.