पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवले जातील. महापालिका प्रशासन या शाळांकडे विशेष लक्ष देईल. त्यामुळे मनपाच्या शाळा पुन्हा उभारी घेतील, असा आत्मविश्वास महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केला. पर्यावरण संवर्धन समिती, महापालिका सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या प्रदूषण विषयक पोस्टर पेंटिंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच सायन्स पार्कच्या सभागृहात पार पडला. या समारंभात मनोगत व्यक्त करताना महापौर काळजे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या समारंभाला सत्ताधारी पक्षनेता एकनाथ पवार, सिद्धिविनायक समूहाचे संस्थापक तथा ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक अध्यक्ष कुंदन ढाके, विश्वास जपे, पुरुषोत्तम पिंपळे, हिरामण भुजबळ, प्रभाकर मेरूकर, विकास पाटील, सुभाष चव्हाण, सुषमा पाटील, अनघा दिवाकर, रंजना कुदळे, सुनीता जुन्नरकर, मीनाक्षी मेरूकर, अनिल दिवाकर, दत्तात्रेय कुमठेकर, सागर बंडलकर, गोविंद चितोडकर, विकास परदेशी, ताजुद्दीन अत्तार, सूर्यकांत मुठियान, शंकर पाल, दादाराव आढाव, मदन जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
28 शाळांचा स्पर्धेत सहभाग
या स्पर्धेत शहरातील 28 शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात विद्यार्थ्यांनी ‘प्रदूषण’ या विषयावर तब्बल 3 हजार 128 पोस्टर्स रंगवली होती. दरम्यान, या स्पर्धेत सहभागाचे आवाहन करुनही महापालिकेच्या काही शाळांनी सहभाग नोंदविला नव्हता. यासंदर्भात महापौर नितीन काळजे यांनीही मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त केली. सत्ताधारी पक्षनेता एकनाथ पवार यांनी पर्यावरण संवर्धन समितीच्या उपक्रमाचे कौतूक केले. सुषमा पाटील यांनी जल दिनानिमित्त जलप्रतिज्ञेचे वाचन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पर्यावरण संवर्धन पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मेरूकर यांनी तर आभार पुरुषोत्तम पिंपळे यांनी मानले.