पिंपरी-चिंचवड : पालिकेतून निवृत्त होणा-या कर्मचा-यांना एक आठवण म्हणून स्मृतीचिन्ह दिले जाते. मात्र, आता सत्ताधा-यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी स्मृती चिन्ह द्यायचे बंद केले आहे. त्याचसोबत हार, फुले देणे, निमंत्रण पत्रिका छापणे देखील बंद केल्या आहेत. अशा किरकोळ गोष्टीतून पैसे वाचवित असल्याचे सांगून ‘इमेज बिल्डींग’ करण्याऐवजी टक्केवारी कमी करा, असा सल्ला शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सत्ताधा-यांना दिला आहे.
कलाटे म्हणाले की, पालिका कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात येतो. परंतु, त्याची निमंत्रण पत्रिका छापली जात नाही. महापालिकेतून निवृत्त होणा-या कर्मचा-यांना स्मृतीचिन्ह दिले जाते. ही कर्मचा-यांसाठी एक आठवण असते. परंतु, सत्ताधा-यांनी स्मृती चिन्ह द्यायचे बंद केले आहे. हे बंद करुन आम्ही पैसे वाचवित असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत.सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सोबत घेऊन विकास कामे करणे अपेक्षित असते. मात्र, सत्ताधा-यांकडून विरोधकांना संपविण्याचे कारस्थान केले जात आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधकांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष तर आमदार नसून महापालिकेच्या एका वॉर्डाचे नगरसेवक वाटत आहेत, अशी टीकाही कलाटे यांनी केली.